बारमधून बाहेर पडला रस्त्यावर कोसळला, तरुणाला दोन कारने चिरडला... CCTVत घटना कैद

मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडलेला तरुणाला कारने चिरडलं, धक्कादायक म्हणजे कार चालकाने त्याला त्याच अवस्थेत रस्त्याच्या कडेला ठेवलं आणि निघून गेला

Updated: Feb 7, 2023, 07:22 PM IST
बारमधून बाहेर पडला रस्त्यावर कोसळला, तरुणाला दोन कारने चिरडला... CCTVत घटना कैद title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारमधून मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडलेल्या  एका तरुणाला एकामागोमाग दोन कारने चिरडलं. अपघाताची (Accident) ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शहराच्या मध्यभागी असलेल्या रघुवंशी व्यापार संकुलात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

मद्यप्राशन करुन पडला बाहेर
रघुवंशी व्यापार संकुलात असलेल्या एका बारमध्ये रात्री उमंग दहिवले नावाचा तरुण बसला होता. बारमध्ये बसून मद्यप्राशन केल्यानंतर तो बाहेर पडला, पण अती मद्यामुळे त्याला स्वत:चा तोल सांभाळता येत नव्हता. त्याच अवस्थेत काही पावलं चालल्यावर तो रस्त्यातच कोसळला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्याला तुरळक लोकं होती. त्यामुळे त्याला कोणीही मदत केली नाही. रात्री दीडच्या सुमारासत संकुलातील पार्किंगमधून एक कार बाहेर पडली. 

एकामागोमाग दोन कारने चिरडलं
कार चालकाला अंदाज न आल्याने त्याने रस्त्यात पडलेल्या उमंगला कारखाली चिरडलं. ही बाब कार चालकाच्या लक्षात आली त्याने कार थांबवली आणि कारमधून उतरून जखमी अवस्थेत असलेल्या उमंगला रुग्णालयात नेण्याऐवजी रस्त्याच्या कडेला सरकवून ठेवलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. उमंगला रस्त्याच्या कडेला ठेवल्यानंतर कारचालक तिथून निघून गेला. काही वेळात संकुलातून दुसरी कार बाहेर आली. त्या कार चालकालाही अंदाज न आल्याने त्याने उमंगच्या अंगावरुन कार नेली. 

सकाळी दिसला जखमी अवस्थेत
एकामागोमाग दोन कारने चिरडल्याने उमंग जबर जखमी झाला. त्याच अवस्थेत तो रात्रभर पडून होता. सकाळी या ठिकाणी आलेल्या काही नागरिकांना उमंग रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने उमंगला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेलं, पण तोपर्यंत उमंगचा मृत्यू झाला होता. 

ही घटना नेमकी कधी आणि कशी घडली. यातील दोन्ही कारचालक मद्यधुंद अवस्थेत होते काय. मृत उमंग सोबत आणखी किती लोक या बारमध्ये होते. याचा तपास शहर पोलीस करत आहेत. सध्या 2 कार चालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान व्यापार संकुलाच्या वाहनतळात उभारलेल्या बारमुळे या संकुलातील व्यापार- व्यवसाय बाधित होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून पोलीस व उत्पादन शुल्क विभाग यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे