Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे 'माफीवीर' फ्लेक्स

Rahul Gandhi on Veer Savarkar :  खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Updated: Nov 18, 2022, 02:13 PM IST
Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे 'माफीवीर' फ्लेक्स title=

Rahul Gandhi on Savarkar : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झालेत. तर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलीय. पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यासमोरच 'माफीवीर' असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावलेत. ( Rahul Gandhi's Veer Savarkar Statement )

सावरकर समर्थकांनी काँग्रेसचे पोस्टर फाडले

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे फ्लेक्स लावलेत. सारसबाग चौकातील सावरकरांच्या पुतळ्यासमोरच काँग्रेसने राहुल गांधींनी दिलेल्या पुराव्याचे हे फ्लेक्स लावलेत. त्यावर संतापलेल्या सावरकर समर्थकांनी काँग्रेसचे हे पोस्टर फाडून टाकले. जितेंद्र वाघ नावाच्या एका सावरकर प्रेमीने पुण्यात लावलेले हे बॅनर फाडलेत. (अधिक वाचा - राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी, मोठी खळबळ)

 राहुल गांधी पुन्हा कोणावर निशाणा साधणार?

बुलढाण्याच्या शेगावमध्ये आज राहुल गांधींची सभा होणार आहे...भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज 11 वा दिवस आहे. दुपारी पावणे चारच्या सुमारास शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधींची सभा होणार आहे. या सभेत राहुल गांधी कोणावर निशाणा साधणार, ते आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करणा-या राहुल गांधी यांना मनसे आज काळे झेंडे दाखवणार आहे. राहुल गांधी यांच्या शेगाव इथल्या सभेआधी मनसे आंदोलन करणार आहे. काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचे आदेश स्वतः राज ठाकरेंनी दिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही. निषेध होणारच असा इशारा देण्यात आलाय. मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि पदाधिकारी संभाजीनगरातून शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. याशिवाय मुंबईवरूनही मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी रवाना झाले आहेत. 

तर दुसरीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे.'अपशकुन करणा-यांना यश मिळणार नाही' असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय...राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्याबद्दल यात्रेला मनसे काळे झेंडे दाखवणार आहेत.

राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल

तर दुसरीकडे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 'बाळासाहेबांची शिवसेना'कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

..तर महाविकास आघाडीतही फूट - राऊत

दरम्यान, वीर सावरकरांवरील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकेल, असा इशारा ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. वीर सावरकरांची कोणतीही बदनामी शिवसेना सहन करणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल यांचं हे वक्तव्य शिवसेनाच काय राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनाही मंजूर नसेल, असे राऊत म्हणाले. राहुल गांधी यांच्या सावकर वादावर तोडगा काढू असे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.