साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण दबदबा निर्माण करतंय?

१९५२ सालापासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात २०१९च्या निवडणुकीसाठी भाजपनंही रणनीती आखलीये. 

Updated: Jun 5, 2018, 11:25 PM IST
साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण दबदबा निर्माण करतंय? title=

विकास भोसले, झी मीडिया, सातारा  : १९५२ सालापासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात २०१९च्या निवडणुकीसाठी भाजपनंही रणनीती आखलीये. या रणनीतीचा मुख्य भाग म्हणजे विद्यमान खासदार उदयनराजे भोसलेंना आपल्याकडे खेचणं हा आहे... मात्र खासदारांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नसल्यानं सगळ्याच पक्षांची पंचाईत झालीये.... 

२००९ पूर्वी सातारा आणि कराड असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. मात्र मतदारसंघ फेररचनेमध्ये कराड मतदारसंघ रद्द झाला आणि केवळ सातारा शिल्लक राहिला. निवडणुकांना सुरूवात झाली तेव्हापासून ते अगदी १९९६ सालापर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ... यशवंतराव, प्रेमालाताई चव्हाण यांनी काँग्रेसला अधिक बळकटी दिली. ९६ साली शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी बाजीर मारली. मात्र आता सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड बनलाय... आपल्या सडेतोड वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेले उदयनराजे सध्या साताऱ्याचे खासदार आहेत... उदनयराजे इथले अनभिषिक्त सम्राट आहेत.. २०१४च्या निवडणुकीची आकडेवारी त्यासाठी पुरेशी बोलकी आहे... 

या निवडणुकीत उदनराजेंना ५ लाख २२ हजार ५३१ मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावरचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना होती केवळ १ लाख ५५ हजार ९३७ मतं... आणखी एक अपक्ष उमेदवार राजेंद्र घोरगे यांना ८२ हजार ४८९ मतं पडली. शिवसेना-भाजपा-रिपब्लिकन युतीचे उमेदवार अशोक गायकवाड ७१ हजार ८०८ मतांसह चौथ्या स्थानी राहिले. 

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण आणि कराड दक्षिण असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. १९९९ला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून इथून सलग राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येतोय. श्रीनिवास पाटील यांनी १९९९ साली माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांचा २ लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. हा पराभव काँग्रेसच्या एवढा जिव्हारी लागलाय, की गेल्या २० वर्षांत पक्षानं इथं उमेदवारच दिलेला नाही. हा मतदारसंघ शरद पवारांचा हुकमी एक्का समजला जातो. पवारांनी दिलेला उमेदवार इथून हमखास निवडून येतो. मात्र गेल्या ३ वर्षांत भाजपानं इथं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीये. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदनयराजेंना अप्रत्यक्षपणे जाहीर निमंत्रणच दिलं होतं... यावरून भाजपाच्या मनात काय आहे, हे स्पष्ट होतं... 

दिलखुलासा आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले आणि प्रसंगी आपल्याच पक्षाविरोधात भूमिका घेणारे उदनराजे केवळ शरद पवारांचाच आदेश मानतात. गेल्या वर्षभरात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले या दोन भावामध्ये टोल नाक्याच्या ठेक्यावरून ठिणगी पडली आणि राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. यामुळे पक्षाच्या चारही आमदारांनी  उदयनराजेंविरोधात बंड पुकारलं. मात्र काही झालं तरी आगामी निवडणुकीत आपणच उभे राहणार, याची उदनराजेंना खात्री आहे... 

अजित पवार, रामराजे नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे आमदार मकरंद पाटील, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी उदयनराजेंविरोधात उघड नाराजी व्यक्त केलीये. त्यामुळे पुढल्या निवडणुकीत उदयनराजेंचं तिकिट कापून सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे  यांना उमेदवारी मिळू शकेल. 

मात्र सध्यातरी सातारा लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांनी थांबा आणि वाट पाहा हे धोरण अवलंबलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच, तर काँग्रेसला उमेदवार शोधण्याची गरज नाही. मात्र राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत दुफळीचा फायदा उचलण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपच्या वरिष्ठानी उदयनराजेंना ऑफर दिलीये... 

मात्र भाजपामध्येही  उदयनराजेंचं खुल्या दिलानं स्वागत होईल असं नाही. पक्षातल्या एका गटाचा त्यांना पक्षात घेण्यास विरोध आहे. गेल्या २ निवडणुकांमध्ये राजेंना टक्कर देणाऱ्या पुरुषोत्तम जाधव यांना तिकिट द्यावं, असं भाजपामधल्या या गटाला वाटतंय. दुसरीकडे शिवसेनेनंही जिल्ह्यामध्ये संपर्क वाढवलाय. युती होण्याची शक्यता नसल्यानं आपला तुल्यबळ उमेदवार उतरवण्याची तयारी 'मातोश्री' करत आहे. त्यासाठी अनेक जण इच्छुकही आहेत... 

गेल्या निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानादेखील साताऱ्याचा बुरूज सर करणं भाजपाला शक्य झालेलं नव्हतं... मात्र आता राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले चारही आमदार उदयनराजेंच्या विरोधात गेलेत. त्यातच त्यांची भाजपाशी जवळीक वाढत चालली आहे. पण उदयनराजेंनी आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. त्यांनी जिल्ह्यात आपली वेगळी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी किंवा भाजपा किंवा या दोघांचीही तिकिटं नाकारून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय उदयनराजे घेऊ शकतात... काही झालं तरी पुढल्या निवडणुकीत उदयनराजे हाच फॅक्टर मतदारसंघात महत्त्वाचा ठरणार आहे, हे नक्की...