नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक ठरणार रंगतदार

नांदेड... मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचं दुसऱ्या क्रमांकांच मोठं शहर... १६ तालुके असल्याने नांदेड जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागला गेलाय... 

Updated: Jun 15, 2018, 11:31 PM IST
नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक ठरणार रंगतदार title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेड... मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचं दुसऱ्या क्रमांकांच मोठं शहर... १६ तालुके असल्याने नांदेड जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागला गेलाय... नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, मुखेड आणि देगलुर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे... नांदेड लोकसभा मतदार संघ हा कायम कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय... आजवर झालेल्या १९ लोकसभा निवडणुकांपैकी १५ काँग्रेसनं जिंकल्यात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण दोनवेळा नांदेडमधून लोकसभेवरही निवडुन गेलेत... एकदा शेड्युल कास्ट फेडरेशन, एकदा जनता पार्टी, एकदा जनता दल आणि एकदा भाजपनं कॉंग्रेसच्या या बालेकिल्याला तडे दिले... पण काँग्रेसची पाळंमुळं इथं खोलवर रुजलीत...

नांदेडचं नाव आलं चव्हाण घराण्याचं नावही आपसूकच येतं... शंकरराव चव्हाण यांच्या रुपाने नांदेडला दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं... अशोक चव्हाण यांच्या रुपानेही तिसऱ्यांदा नांदेडला मुख्यमंत्रीपद लाभलं. आदर्श प्रकरणामुळं अशोक चव्हाणांना नोव्हेम्बर २०१० मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावे लागले... त्यानंतर तब्बल चार वर्षे अशोक चव्हाण राजकीय विजनवासात होते... २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना लोकसभेची ऊमेदवारी देऊन कॉंग्रेसने चव्हाणांचं पुनर्वसन केले... निवडणुकीत आदर्श प्रकरणावरून विरोधकांनी अशोक चव्हाणांना लक्ष्य केलं. स्वतः नरेंद्र मोदी यांनी नांदेड मध्ये सभा घेऊन सरकार आल्यास अशोक चव्हाणां सारख्यांना जेल मध्ये टाकण्याची भाषा केली होती... पण चव्हाणांनी मोदी लाट रोखलीच नाही तर मोदी लाटेतही तब्बल ८२ हजारांचं मताधिक्य घेतलं... विशेष म्हणजे महाराष्ट्रात नांदेड आणि हिंगोली अशा केवळ दोनच जागा निवडून आल्या. अशोक चव्हाणांमुळंच हिंगोलीतून राजीव सातव निवडून आल्याचं राजकीय जाणकार सांगतात...

लोकसभेला नांदेडकरांनी अशोक चव्हाणांना भरभरून साथ दिली. पण विधानसभेला शिवसेनेचे ४ आणि भाजपाचा १ आमदार विजयी झाला. नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत मात्र अशोक चव्हाणांनी ही कसर भरून काढली. काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपसह अन्य विरोधकांनी जंग जंग पछाडलं. पण अशोक चव्हाण सगळ्यांना पुरून उरले. आता लोकसभेत पुन्हा एकदा चव्हाण विरोधकांनी एकत्र येऊन मोर्चेबांधणी सुरू केलीय.
 
आगामी लोकसभा निवडणूक अशोक चव्हाण लढवणार नाहीत, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. विधानसभा निवडणूक लढवून महाराष्ट्राच्या राजकारणात ते स्थिरावतील, असा अंदाज आहे. त्यामुळं २०१९ ची लोकसभा निवडणूक फारच रंगतदार ठरणाराय. पक्षादेश म्हणून लोकसभेसाठी चव्हाण स्वतः उभे राहणार की, जवळचा उमेदवार देणार याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय...