Vedanta-Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, वादात आता राष्ट्रवादीची उडी

Vedanta-Foxconn project to Gujarat : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्यानं राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.  

Updated: Sep 15, 2022, 08:18 AM IST
Vedanta-Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, वादात आता राष्ट्रवादीची उडी title=

मुंबई : Vedanta-Foxconn project to Gujarat : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्यानं राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, वेदांता - फॉक्सकॉनसंदर्भात (Vedanta-Foxconn) आधीच निर्णय झाला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे. सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय जुलैतच घेतल्याचं स्पष्टीकरण वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिले आहे. भविष्यात महाराष्ट्रातही ते इंटिग्रेटेड प्रकल्प आणण्याचं काम करणार आहेत, असंही ते म्हणाले.  तर दुसरीकडे या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. वेदांत फॉक्सकॉनवरुन राष्ट्रवादी, युवासेना आक्रमक झाली आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जुलैत महाराष्ट्र सरकारने कसोशीने प्रयत्न केला होता, असंही ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. अनिल अग्रवाल यांच्या या ट्विटमुळे शिंदे सरकारला दिलासा मिळणार आहे. 

राष्ट्रवादी, युवासेना आक्रमक

वेदांत फॉक्सकॉनवरुन राष्ट्रवादी, युवासेना आक्रमक झाली आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंत्रालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत. मात्र तरिही आंदोलनावर ठाम असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दिली आहे. तर दुसरीकडे युवासेनेनंही राज्यभर आंदोलन पुकारले आहे.

युवा शिवसेनेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. 'शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावल्याची टीका युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. दरम्यान, याआधी माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला या मुद्द्यावरुन धारेवर धरले आहे. खोके सरकारमुळे आपल्या राज्यातील प्रकल्प गुजरातला गेला, असा थेट आरोप केला आहे.

दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन राज्यात संलग्न प्रकल्प उभारणार आहे, त्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानलेत. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी आम्ही नेहमीच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असे फडणवीस यांनी म्हटले आहे. राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

काँग्रेस Vedanta-Foxconn Project वरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने मुंबई गुजरातला दिल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटले आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पटोले यांनी ही टीका केली आहे.  'भाजपराज्यातील नेते राज्यातील सर्वस्व लुटून गुजरातला देत आहेत.'  महाराष्ट्र भाजपचे नेते राज्याची लूट करत आहेत आणि दिल्लीत आपल्या नेत्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुजरातला देत आहेत. जी कंपनी गेली त्या कंपनीने 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असेल तर हे योग्य नाही, असे ते म्हणाले.