माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

हिरा या माऊलींच्या अश्वाचं निधन झाल्यानंतर नव्या अश्वाने माऊलींच्या पालखी सोहळ्यात आपली सेवा सुरू केलीये. 

Updated: Jul 14, 2018, 06:59 PM IST
माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न  title=

सातारा: माऊलींच्या पालखी सोहळ्यात आज पहिलं रिंगण पार पडलं. चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभं रिंगण पार पडलं. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांमध्येही मोठी उत्सुकता असते. यावेळी पहिल्यांदाच हा अश्व या उभ्या रिंगणाची दौड घेणार होता. त्यामुळे त्याचीही उत्सुकता वारकऱ्यांमध्ये होती. हिरा या माऊलींच्या अश्वाचं निधन झाल्यानंतर नव्या अश्वाने माऊलींच्या पालखी सोहळ्यात आपली सेवा सुरू केलीये. 

तर दुसरीकडे काटेवाडीमध्ये आज तुकोबांच्या पालखीत मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. परंपरेप्रमाणे पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचं ग्रामस्थांनी स्वागत केलं. काटेवाडीचे ग्रामस्थ आणि परिसरातले अनेक भाविक या पायघड्या घालण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. तर मेंढ्यांचा तुकोबारायांच्या पालखीभोवतीचा रिंगण सोहळा हाही वारकऱ्यांसाठी एक आनंददायी क्षण  असतो. मेंढ्यांच्या रिंगणासाठी पंच्रकोशीतून अनेक भाविक काटेवाडीत मेंढ्यांसह हजेरी लावतात.