राजकारण्यांचं 'च' 'भ' आता 'झ'... महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्या झाल्या ओव्या

महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी अगदीच घसरलीय.. नेते एकमेकांना जाहीरपणं शिव्या घालू लागलेत. महाराष्ट्रात शिवराळ राजकारण सुरु झाला आहे. 

Updated: Dec 5, 2023, 07:57 PM IST
राजकारण्यांचं 'च' 'भ' आता 'झ'... महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्या झाल्या ओव्या title=

Maharashtra Politics: सुसंस्कृत, प्रगल्भ राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शिवराळ भाषेची लागण झालीय.. नालायक, भिकारचोट असे शब्द सर्रास वापरले जातायत. राजकीय नेते माईकसमोर जाहीरपणे शिवीगाळ करु लागलेत. आधी चच्या शिव्या, मग भच्या शिव्या आणि आता राजकारणी थेट झच्या शिव्या माईकसमोर देऊ लागलेत. आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका करताना जीभ घसरली.

काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींनी शिवीगाळ केली होती. एकनाथ शिंदेंना लावण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट या उपाधीवरुन टीका करताना दत्ता दळवींनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. संजय राऊतांनीही अनेक वेळा ऑन कॅमेरा किरीट सोमय्यांबद्दल अशीच शिवराळ भाषा वापरलीय. अब्दुल सत्तार, संजय गायकवाड, गोपीचंद पडळकर हेही नेते शिवराळ भाषा वापरल्यामुळे नुकतेच अडचणीत आलेत.

संजय राऊतांवर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली. राऊत रोज सकाळी उठून वेड्यासारखं बोलतात. हा सपशेल मूर्खपणा आहे, असं शेलार म्हणाले.. आम्ही ध्येयवेडे आहोत, तर राऊत बोलघेवडे आहेत, अशी सारवासारवही त्यांनी नंतर केली.

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकावं; शिंदे गटाचा सल्ला

निवडणूक निकालाच्या निमित्तानं संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधलाय. तेरा क्या होगा कालिया? असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलंय. भाजपला मोदी लाट दिसू लागलीय. त्यामुळे 2014ला जे महाराष्ट्रात घडलं तेच आता गद्दार गटासोबत होईल असं राऊतांनी म्हंटलंय. तर उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकावं असा सल्ला शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी दिलाय. 
नेते वापरत असलेली शिवराळ भाषा महाराष्ट्राला अगदीच काही नवीन नाही. मात्र आता नेते थेट ऑन कॅमेरा शिव्या द्यायला लागलेत. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका. योग्य वेळ आली की, अशा नेत्यांना तुम्ही योग्य उत्तर द्या.