Accident : आजीबरोबर मुंबईतून कोकणात (Mumbai to Konkan) जाणाऱ्या नातवंडांचा प्रवास अखेरचा ठरला. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जणं गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतल्या बोरीवली इथं राहणाऱ्या तावडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तावडे कुटूंबीय आपल्या मारुती इस्टीलो कारमधुन बोरीवली येथुन देवगडला कोकणात जात असताना माणगाव तालुक्यातील कशेणे गावाजवळ हा अपघात झाला.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ ट्रक आणि मारुती इस्टीलो कारमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील तीघांचा मृत्यू झाला असुन यामध्ये दोन लहानग्या नातवांसह आजीचा मृतांमध्ये समावेश आहे. रिवान दर्शन तावडे वय वर्ष 3, रित्या दर्शन तावडे वय 6 महिने आणि वैशाली विजय तावडे वय वर्ष 72 अशी मृतांची नाव आहे. तर दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे जखमी झाले आहेत.
यवतमाळमध्ये मायलेकींचा मृत्यू
दरम्यान, यवतमाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह ही महिला गावी जात होती. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. संजीवनी नागतूरे असं मृत महिलेचं नाव आहे. मृत महिला ही कुर्ली गावातील रहिवाशी आहे. वणी इथून शिंदोला इथं जाणाऱ्या ऑटो रिक्षाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात सहा जण जखमी झाले आहे.
नाशिकमध्येही भाऊ-बहिणीचा मृत्यू
नाशिकमध्येही अपघाताची एक दुर्देवी घटना घडली आहे. दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा यात मृत्यू झाला. पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. साहिल सुनील शिरसाठ 15 आणि स्नेहल सुनील शिरसाठ (12) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत. अपघातात तीन जणं जखमी झालेत.
साताऱ्यात तिघांचा मृत्यू
साताऱ्यातील लोणंद निरा रोडवर झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी आणि दुचाकीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातात मृत्यू झालेले तिनही तरुण पुरंदर तालुक्यातील पिपंरे खुर्द इथं राहाणारे होते. रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेल्या एसटीबसची मोटारसाईकलसोबत जोरदार धडक झाली.