प्रफुल्ल पवार / अलिबाग : चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. या वादळात विद्युत खांबांचे नुकसान झाले. या परिणाम हा येथील विजपुरवठ्यावर झाला. अनेक दिवस अंधारात राहावे लागले होते. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या भेडसवत होती. यावर आता काम सुरु झाले आहे. अलिबागकरांची आता वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येतून कायमची सुटका होणार आहे. आलिबागमधील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यातून ही योजना राबवली जात आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर उदभवलेली समस्या पाहता हे महत्वपूर्ण पाऊल समजले जात आहे.
या योजनेसाठी ८९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. राज्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. किनारपट्टीला बसणारे चक्रीवादाळाचे धक्के, त्यामुळे विद्युत खांब कोलमडून होणारे अपघात टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवला जात आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गंत अलिबाग नगरपालिकेबरोबरच लगतच्या चेंढरे आणि वरसोली या दोन ग्रामपंचायतींमधील ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
रायगड । अलिबाग शहर आणि परिसरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरु । चक्रीवादळाच्या पार्शवभूमीवर महत्वाचे पाऊल । जागतिक बँकेच्या सहकार्याने राष्ट्रीय आपत्ती धोके निवारण कार्यक्रमांतर्गत राबवला जातोय प्रकल्प । ८९ कोटी रुपये होणार खर्च https://t.co/Ct4fYevvP7 @ashish_jadhao pic.twitter.com/C2CseQOeTh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 30, 2020
वनविभागाची आडकाठी विविध परवानग्या मिळण्यात झालेला विलंब यामुळे हे काम मंद गतीने सुरु होते. ३ जून रोजी आलेल्या चक्रीवादळाने जिल्हयातील वीजवितरणाचा पुरता बोजवारा उडाला . वीजेचे खांब उन्मळून पडल्याने जिल्हयातील जवळपास दोन हजार गावे , वाडया वस्त्यांवरील वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे भूमिगत विद्युत वाहीनी किती महत्वाची हे महावितरणच्या लक्षात आले. आणि तातडीने कामाला सुरुवात झाली आहे. विद्यानगर ते अलिबाग या मार्गावर मुख्य वाहिनी टाकण्यास सुरुवात झालेली आहे. शहरातील कामानेदेखील आता वेग घेतला आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या राहणार नाही. प्रत्येक आपत्तीतून माणूस काहीतरी शिकतो असं म्हणतात. याचाच प्रत्यय या निमित्ताने आलेला पाहायला मिळत आहे. अलिबाग शहरात जे सबस्टेशन आहे त्याची नव्याने उभारणी करत आहोत अत्याधुनिक पदधतीचे हे सबस्टेशन असेल . त्याच्यासाठी येणारी जी लाईन आहे ती पूर्णपणे अंडरग्राउंड करुन घेत आहोत. सबस्टेशनपासून ट्रान्सफार्मर आणि तेथून ग्राहकांपर्यत जाणारी लाईनदेखील अंडरग्राउंड करून घेतली जात आहे . हा प्रकल्प पूर्ण व्हायला एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांनी दिली.
अलिबाग शहरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. यापुढे किमान उरण , मुरूड आणि श्रीवर्धन या शहरी भागात किमान भूमीगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे . तशी मागणी आपण करतोय असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.