Tejas Thackeray : उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. अरुणाचल प्रदेशात आढळणा-या जपलुरा मिक्टोफोला या सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनन लावला आहे. सरड्याची ही प्रजाती हिमालय आणि इंडो-बर्मा प्रदेशात आढळणा-या जपलुरा वंशातील आहे.
यापूर्वी तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दूर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दूर्मीळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैववैविध्यात भर पडलीय. भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरिर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधुन घेत आहेत. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी शोधलेल्या दुर्मिळ पालीचं नाव "मँग्निफिसंट डवार्फ गेको" असं करण्यात आलं. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या "झुटाक्सा" या नियतकालिकेत प्रसिद्ध झाल्या होत्या.
तेजस ठाकरेंच्या टीमनं मेघालयातील जंगलात एका माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. ‘चन्ना स्नेक हेड’ असं या दुर्मीळ माशाचं नाव आहे.. त्यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली होती. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले होते.
गोगलगायींच्या दोन नव्या प्रजातींचा शोधही ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या वतीने तेजस ठाकरे आणि टीमने लावला होता. आंबोली आणि राधानगरी येथे हा शोध लावलाय..‘वरदिया आंबोलीएन्सीस’ आणि ‘पेरोटेरिया राजेशगोपाली’ अशी नावे त्यांना देण्यात आलीत.
पर्यावरणप्रेमी तेजस ठाकरे आणि मित्रांनी लाल रंगाच्या ईल माशाचा शोध लावला होता. या लाल ईल माशाचं 'मुंबा' असं नामकरण त्यांनी केले होते. मुंबई आणि पश्चिम घाट परिसरात लाल ईल मासा सापडला. याआधीही तेजस आणि मित्रांनी खेकड्यांच्या सहा दुर्मीळ प्रजातींचा शोध लावला होता. प्रवीणराज नरसिंम्हन, अनिल मोहापात्रा आणि अन्नम पवन कुमार यांचाही संशोधनात सहभाग आहे.