मोदी, शहांना शह देण्यासाठी ठाकरे-पवारांची कोरेगाव-भीमा खेळी?

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी केल्यानं आधीच राजकीय वातावरण तापलंय. त्यात आता अनेक प्रश्न निर्माण झालेत

Updated: Dec 24, 2019, 06:15 PM IST
मोदी, शहांना शह देण्यासाठी ठाकरे-पवारांची कोरेगाव-भीमा खेळी? title=

मुंबई : कोरेगाव भीमामध्ये दोन वर्षांपूर्वी उसळलेल्या दंगलीचा संबंध पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवाद्यांशी जोडला. मात्र, शरद पवारांनी या चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार याबाबत आता फेरचौकशी करणार का? अशी चर्चा सुरू झालीय. एल्गार प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं शरद पवार यांनी नुकतंच म्हटलं होतं. शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर यावर 'अशी वक्तव्यं करून पवार पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करत असल्याची' टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

(राष्ट्रवादाला मारक भूमिका घेणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे)

कोरेगाव भीमा स्मृतीदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पवार आणि फडणवीसांमध्ये हा कलगीतुरा रंगलाय. या दंगलीचा संबंध पुण्यातल्या एल्गार परिषदेशी जोडण्यात आलाय. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी ठेवलाय. या निमित्तानं फडणवीस सरकारनं शहरी नक्षलवादाचा मुद्दा ऐरणीवर आणला.

(अधिक वाचा - शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी)

या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी झालेली बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोरेगाव भीमा दंगलीतलं सत्य बाहेर यायला हवं, असं मत आंबेडकरांनी या भेटीनंतर व्यक्त केलं.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी केल्यानं आधीच राजकीय वातावरण तापलंय. त्यात आता अनेक प्रश्न निर्माण झालेत. सामाजिक कार्यकर्त्यांवर शहरी नक्षलवादी असल्याचा पोलिसांनी ठेवलेला ठपका खरा आहे का? त्यांनी खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता का? की केवळ राजकीय स्वार्थासाठी हा बनाव रचण्यात आला? या निमित्तानं मोदी-शाहांवर राजकीय डाव उलटवण्याची खेळी पवार-ठाकरेंनी आखलीय का? या प्रश्नांच्या उत्तरांकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.