उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर

Deepak Kesarkar :  आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली

Updated: Jun 30, 2022, 01:21 PM IST
उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर title=

पणजी, गोवा : Deepak Kesarkar Press conference : भाजपसोबत जाण्यावर आम्ही ठाम आहोत. पुढील रणनिती ठरविण्यात येईल. मात्र, उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी आम्ही कोणतेही सेलिब्रेशन केलेले नाही. ते आमचे नेते आहेत आणि पुढेही असणार आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कायम आहे. ज्यांना घेऊन सत्ता स्थापन केली. त्याला आमचा विरोध होता. ही भूमिका कायम होती आणि आहे. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोण असेल तर तसे काहीही नाही. याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. शिंदे यांच्यासोबत आलेले आमदार आहेत, त्यांच्या मनात मंत्रीपदाबाबत काहीही निर्णय नाही. 

आम्ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधात नाही. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत. पण तरीही ते त्यांच्यासोबत आहेत. ठाकरेंविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात  गेलो नाही. ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे. शिवसेना पक्ष नाहीसा करण्याचा प्रयत्न झाला होता. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेच्या मतदार संघातील दोन नंबरच्या उमेदवाराला दोन्ही काँग्रेसकडून पाठिंबा दिला. पक्षप्रमुखांकडे याबाबत माहिती दिली होती. मात्र, आजही ते महाविकास आघाडीसोबत आहेत, असे केसरकर म्हणाले. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुळे आम्हाला आमची भूमिका मांडावी लागली. मुख्यमंत्री आजही आमचे नेते आहेत. मूळ विचारधारेबरोबर राहाव अशी आमची इच्छा आहे. आमच्या आमदारामध्ये संभ्रम व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मंत्रिमंडळमध्ये हा मंत्री असेल तो असेल असं नाही. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, जो काही निर्णय असेल तर ते घेतील. एकही आमदार हे मंत्रिपदासाठी आलेले नाहीत, तत्वासाठी आमच्या सोबत आलेत. मुख्यमंत्री पद सोडून  भाजप सोबत कोणतेही वाद नव्हते. संजय राऊत यांनी चुकीचे ट्विट केले आहे. संजय राऊत जेवढे कमी बोलतील तेवढे चांगले असेल, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले आहेत. जो काही निर्णय होईल, तो राज्याच्या विकासासाठीच होईल.आम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही, संजय राऊत यांनी केलेली अशी विधाने लोकांमध्ये नाराजी पसरवण्यासाठी आहेत, असे दीपक केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. जवळपास 1 ते दीड तास चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदारांचे चांगले संबंध आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान केले, अस स्वतः राऊत यांनी सांगितले.मग मुख्यमंत्री यांनी कारवाई का केली नाही. शिंदे यांना पदावरून काढले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्यासोबतची चर्चा फिस्कटली, अशी माहिती केसरकर यांनी दिली.