'अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा', उदय सामंत यांना धमकीचा फोन

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला एका संघटनेच्या वतीने धमकीचा फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Updated: Sep 15, 2020, 07:34 PM IST
'अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा', उदय सामंत यांना धमकीचा फोन title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला एका संघटनेच्या वतीने धमकीचा फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदय सामंत हे सध्या विद्यापीठांच्या परीक्षांबाबत कुलगुरूंना भेटण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारच्या सुमारास एका संघटनेच्या वतीने पोलिसांमार्फत त्यांना या धमकीची माहिती मिळाली आहे.

दरम्यान या प्रकाराबाबत उदय सामंत यांनी पोलिसांना फोन करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उदय सामंत यांना एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून भेटण्याची वेळ मागितली होती. आज उद्या सामंत त्यांना भेटणार होते. याच संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून काल पासून उदय सामंत यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट टाकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना न भेटण्याचे उदय सामंत यांना सांगितले.

त्यानंतर त्याच कार्यकर्त्याकडून उदय सामंत यांच्या पीएला फोन करून अमरावती बाहेर निघून दाखवा, अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली. त्यामुळे उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.