अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात कुपोषणासह दूषित पाण्याचा (Contaminated water) प्रश्नही गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी मेळघाटच्या पाचडोंगरी भागात दूषित पाणी प्यायल्याने तीन जणांना जीव गमवावा लागला तर 70 ते 80 जणांची प्रकृती बिघडली होती.
दूषित पाण्यामुळे आणखी एका चिमुकलीला जीव गमावावा लागल्याची घटना अचलपूरमध्ये घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदी बू. गावातील वेदश्री निलेश मेहरे या दोन वर्षाच्या चिमुकलीला कॉलरामुळे मृत्यू झाला आहे.
वेदश्रीला कॉलराची लगाण झाल्यानंतर तिच्यावर तिच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. वेदश्रीच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
तसेच कॉलरामुळे एका महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षाच्या चिमरुडीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शिंदी गावातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकसहभागातून बोरवेल खणण्यात आल्या आहेत. या बोअरवेलमधून गावकऱ्यांनी टाकलेल्या पाईपलाईन चक्क सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामधून गेल्या आहेत. हेच दूषित पाणी गावकऱ्यांना प्यावं लागत आहे. त्यामुळे वैदश्रीचा मृत्यू झाला आहे.