तुकाराम मुंढे आता पुणेकरांनाही नकोसे, महापौर मुक्ता टिळक आक्रमक

प्रामाणिक, शिस्तप्रीय तसंच कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता पुणेकरांनाही नकोसे झाले आहेत. महापौर मुक्ता टिळक याप्रकरणी अधिक आक्रमक झाल्यात.

Updated: Jun 29, 2017, 05:28 PM IST
तुकाराम मुंढे आता पुणेकरांनाही नकोसे, महापौर मुक्ता टिळक आक्रमक title=

पुणे : प्रामाणिक, शिस्तप्रीय तसंच कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता पुणेकरांनाही नकोसे झाले आहेत. महापौर मुक्ता टिळक याप्रकरणी अधिक आक्रमक झाल्यात.

पुणे महापालिकेतील बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा कारणावरून तुकाराम मुंढे यांना थेट राज्य शासनाच्या सेवेत परत पाठवण्याचे सूर महापालिका वर्तुळात उमटू लागले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील करण्यात येणार आहे.   

एक सक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याविषयी सध्या पुण्यात अशी ओरड सुरु आहे. तुकाराम मुंढे हे पीएमपीएल म्हणजेच पुणे महानगर परिवहन कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल प्रसिद्ध आहेत. त्याचा अनुभव पुण्यातील कारभाऱ्यांना येऊ लागताच संघर्ष उभा राहिलाय. 

शालेय वाहतुकीतील शुल्कवाढ तसंच पीएमपीएल संदर्भातील इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंढे यांना महापालिकेत बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी ते आले नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बैठक रद्द करत मुंढेंचा निषेध केला. 

हा विषय इतक्यावरच थांबला नाही तर मुंढे यांना राज्य शासनाच्या सेवेत परत बोलावून घेण्याची मागणी सत्ताधाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडमधील सत्ताधाऱ्यांचीही हीच भूमिका आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधी आणि तुकाराम मुंढे  यांच्यातील संघर्ष खरोखरच टोकाला पोहोचलाय. तुकाराम मुंढे यांची पीएमपीएलवर नियुक्ती होताच आनंद व्यक्त करणारे प्रवासी प्रतिनिधीही आता विरोधात बोलू लागले आहेत.  

तुकाराम मुंढे हे एक चांगले अधिकारी आहेत याबद्दल वाद नाही. मात्र ते जिथे जातील तिथे वादग्रस्त ठरतात ही वास्तविकता आहे. पुण्यात जे घडतंय त्याविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही मुंढे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.                  

तुकाराम मुंढेंचा कारभार मनमानी, असा आरोप करण्यात आलाय. तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत,  त्यांनी पीएमपीएलमध्ये केलेल्या सुधारणांचे दावे खोटे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी ४० लाख पुणेकरांचा अपमान केलाय, असे आरोप पुणेकरांकडून करण्यात आलेत.