अमर काणे, झी २४ तास, मुंबई : ही सत्यकहाणी धक्कादायक आहे, प्रेमात आय लव्ह यू हे चार शब्द खूप काही असतात, पण या घटनेत या व्यक्तीला दुसऱ्या ४ शब्दांमुळे जीव गमवावा लागला. हे चार शब्द तुम्हाला सुरुवातीला साधे वाटतील, पण पूर्ण कहाणी वाचल्यानंतर नाही. हे ४ शब्द एवढेच होते, ''कुछ नया करते है''. ही संपूर्ण सत्यकथा तुम्हाला व्यवस्थित एका बाजूने वाचावी लागेल, त्याशिवाय नेमकं काय घडलं हे तुम्हाला कळणार नाही.
तुम्ही नेटफ्लिक्स पाहत असाल, तर बहुतांश स्टोरीमध्ये ''लव्ह, सेक्स और धोका'' ठरलेला असतो, गोल गोल फिरवून तेथेच आलेल्या या कथानकातून काहीच निघत नाही. प्रेक्षकांचा वेळ जातो आणि ही सिरिज पाहता पाहता प्रेक्षकांना पहाटेचे ३ , ४ कसे होतात कळतंही नाही. पण नागपूर शहरात जी घटना घडली ती धक्कादायक आहे. नागपूर शहरात ९ मार्च रोजी ही घटना घडली. एका ६४ वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती.
नागपूर पोलिसांसमोर हे मोठं आव्हान होतं. क्राईम सिटी असा बट्टा लागू नये, म्हणून झटपट गुन्ह्याचा उलगडा व्हावा, म्हणून नागपूर पोलिसही अधिक सतर्कतेने तपास यंत्रणा फिरवतात. नागपूर शहरात रजत संकूल येथे लक्ष्मण मलिक या ६४ वर्षीय व्यक्तीची हत्या झाली. लक्ष्मण मलिक यांना ४ बायका असल्याचं तपासादरम्यान माहिती पोलिसांना मिळाली.
लक्ष्मण मलिक हे जरी ६४ वर्षांचे असले, तरी त्यांची चौथी पत्नी ही ३१ वर्षांची होती. म्हणजे लक्ष्मण मलिक यांची चौथी पत्नी स्वातीचं वय हे लक्ष्मण मलिकच्या दुपटीपेक्षा जास्त होतं. स्वाती आणि लक्ष्मण यांच्यात मुलाचा ताबा घेण्यावरुन वाद होता. मुलाचा ताबा घ्यायचा तर लक्ष्मणला संपवणं हाच एक मार्ग आहे, हे स्वातीला वाटत होतं. पण लक्ष्मण मलिकला संपवणं सोपं नव्हतं, लक्ष्मण मलिक या धिप्पाड, मजबूत शरीरयष्टीचा माणूस होता.
मात्र ६४ वर्षीय धिप्पाड लक्ष्मण मलिकला ३१ वर्षाच्या स्वातीने सहज संपवण्याचा डाव आखला. स्वाती ८ मार्च रोजी गोकूळपेठेतील रजत संकूलमध्ये दाखल झाली, तिने येथे पाय ठेवला होता, तो लक्ष्मण मलिकला संपवण्याच्या हेतुनेच.
स्वातीने फ्लॅटवर येऊन लक्ष्मण मलिक याला काही अश्लील चित्रफित मोबाईलमधून दाखवल्या. यानंतर एक चित्रफित दाखवत, "कुछ नया करते है" असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. हे नवीन काही करण्यासाठी तिने लक्ष्मण यांचे हात खुर्चीवर पाठीमागून बांधले.
"कुछ नया करते है" या चार शब्दांच्या प्रलोभनाला लक्ष्मण मलिक चांगलेच भाळले. ते नवीन काही मिळवायला गेले, पण स्वत:ला गमावून बसले. मजबूत शरीरयष्टीच्या लक्ष्मण मलिक याचे हात खुर्चीच्या मागे बांधल्यानंतर चित्रफीतमुळे बेसावध होताच, स्वातीने तीक्ष्ण हत्याराने त्यांचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वाती निघून गेली.
दुसऱ्या दिवशी 9 मार्चला लक्ष्मण मलिक राहत असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांचे मित्र आल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात दिसले. खुर्चीवर हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत त्यांची गळा चिरून हत्या झाल्याचं आढळून आल्यामुळं खळबळ उडाली.
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर लक्ष्मण मलिक यांचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचं समोर आलं. दरम्यान स्वातीचे दुसऱ्या पुरुषाही संबंध असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा मिळाली. त्यातूनच मग या हत्येचा उलगडा झाला.