हेडफोनवर गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, मागून वेगाने ट्रेन येत होती, आणि...

हेडफोन कानाला लावून गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, पण तितक्यात ट्रेन आली आणि

Updated: May 25, 2022, 05:10 PM IST
हेडफोनवर गाणी ऐकत ती रुळावरुन चालत होती, मागून वेगाने ट्रेन येत होती, आणि...  title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : कामावरून घरी परतत असताना कानात हेडफोन लावून रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या तरुणीला रेल्वेची धडक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये समोर आली आहे. धडक लागल्यानंतर मोटरमनकडून स्टेशन मास्तरला वायरलेस संदेश प्राप्त झाल्यावर तत्काळ लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्नेहल वैभव उज्जैनकर अस मृत तरुणीचं नाव आहे. 

जळगावातील शिवाजीनगरजवळ उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपूलाचे काम सुरू असल्यानं या भागातील रहिवाशी हे रेल्वे रुळावरून ये जा करतात. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने शॉटकर्ट म्हणून परिसरातील रहिवासी रेल्वेरुळ ओलांडून प्रवास करतात.

स्नेहल ही तरुणी आई-वडिलांसह शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळेनगरात वास्तव्याला आहे. स्नेहल शहरातील एका कॉस्मेटिक दुकानावर कामाला होती. नेहमीप्रमाणे काम संपल्यावर स्नेहल कामावरून घरी पायी जाण्यासाठी निघाली. 

घराकडे जाण्यासाठी तहसिल कचेरीकडून स्नेहल रेल्वे रुळावर आली.  त्याचवेळी उजव्या बाजूने भुसावळकडून सुरत-भुसावळ पॅसेंजरने येत होती. पण स्नेहलच्या कानात हेडफोन लावून गाणी ऐकत चालली होती. त्यामुळे तिला पॅसेंजरचा आवाज आला नाही. वेगात असलेल्या पॅसेंजरने स्नेहलला धडक दिली. यात स्नेहलचा जागीच मृत्यू झाला. 

स्नेहलच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडताना काळजी घ्यावी कानात हेडफोन घालू नये अन्यथा तुमचाही अपघात होऊ शकतो सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन स्नेहलच्या वडिलांनी केलं आहे.