मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात (ED) सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपांमध्ये मलिक यांचे जमिनीसंदर्भातील व्यवहारांचे तपशील देण्यात आले आहेत. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असणाऱ्या व्यवहाराबद्दल माहिती ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केल्याचे पाह्यला मिळते. यामध्ये मुंबईतील कुर्ला परिसरातील गोवावाला कंपाऊंड नवाब मलिक यांनी डी-गँगच्या संगनमताने बळकावले होते असा मुख्य आरोप करण्यात आला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा राईट हँड असलेला सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. सलीम पटेल राष्ट्रवादीचे सदस्य होते आणि ते हसिना पारकरसाठी काम करत होते आणि त्यांचे नवाब मलिक यांच्याशीही संबंध होते. दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर दाऊद भारतात त्याच्या कारवाया छोटा शकील, अनीस इब्राहिम शेख, जावेद चिकना, टायगर मेमन, इक्बाल मिर्ची आणि बहीण हसिना पारकर यांच्यामार्फत करत होता. तसेच हसिना पारकर अर्ध्या मालमत्तेवर आणि नवाब मलिक अर्ध्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवत होते हे सुद्धा नमूद करण्यात आले. नंतर नवाब मलिक यांनी हसिना पारकर यांच्याकडून उर्वरित मालमत्ता ताब्यात घेतली, जी गुन्ह्यातून विकत घेतलेली मालमत्ता आहे असे ईडीने म्हटले आहे. यासह हसीना पारकर यांचा मुलगा अलीशाह पारकर याने ईडीने घेतलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे की, हसिनासाठी काम करणारे सलीम पटेल गोवावाला कंपाऊंडचा वाद हाताळत होते आणि मलिकने त्यांच्याकडून मालमत्ता घेतली.
नवाब मलिक यांच्यासह ईडीने वांरवार मलिकांच्या कुंटुबियांना सुद्धा चौकशीसाठी बोलावले होते पंरतू ते गैरहजर राहिले. कोर्टात दाखल केलेल्या या आरोपपत्रात ईडीने यांचा मुलगा फराज मलिकला पाच वेळा समन्स बजावण्यात आला आहे. तसेच मुलगा आमिर मलिकला तीनदा समन्स बजावण्यात आला आहे. पण दोघेही चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही आहेत असे सुद्धा आरोपपत्रात ईडीने कोर्टाला सादर केले आहे. ईडीने दाखल केलेल्या या आरोपत्रातील आरोपांमुळे नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मेघा कुचिक, झी न्युज