मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : चिखली तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. जवळपास पाचशे ते साडेपाचशे शेतकर्यांचा शेतमाल खेडा पद्धतीद्वारे खरेदी करून व्यापारी आणि त्याच्या साथीदारांनी शेतमालासह पळ काढला आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. (trader and his partner cheted to farmers and run with various crop at buldhana)
प्राथमिक माहितीनुसार, 10 कोटींपेक्षा जास्त रकमेची शेतकर्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. फसवणूक झालेले शेतकरी चिखली, अंढेरा, आणि धाड पोलिस ठाण्यांत गेल्या दोन दिवसांपासून तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेत आहेत. दोन दिवसांत जवळपास दिडशे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पोलिसांनी या शेतकर्यांचे तक्रार अर्ज आणि पुरावे स्वीकारले आहेत. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन घेण्यास वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे आरोपी संतोष बाबुराव रनमोडे आणि त्याचे दलाल हे पळाले असून, त्यांचा शोध घेण्यासही टाळाटाळ होतेय. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. शेतमाल खरेदीतील फसवणुकीमुळे अख्खा जिल्हा हादरून गेला आहे.
चिखली तालुक्यातील पंधरा ते वीस गावांतील शेतकर्यांना संतोष बाबुराव रनमोडे आणि त्याचे साथीदार अशोक म्हस्के आणि निलेश साबळे यांनी विश्वासात घेतलं. यानंतर या संतोष आणि त्याच्या साथीदारांनी शेतकऱ्यांकडून हरभरा, सोयाबीन आदी शेतमाल जादा दराचे आमिष दाखवून खरेदी केला.
हा खरेदी व्यवहार खेडा पद्धतीने झाल्याने, शेतकर्यांना रोख पैसे न देता त्याने चेक दिले. नातेवाईकांची ओळख आणि इतर विश्वास दिल्याने शेतकर्यांनी आपला शेतमाल त्याला उधारीत दिला. हा शेतमाल रनमोडे याने चिखली एमआयडीसीतील भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये ठेवला होता. दिलेले चेक शेतकर्यांनी बँकांत टाकले असता, ते बाऊन्स झाले. त्यामुळे शेतकर्यांनी रनमोडे, म्हस्के, साबळे यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल स्वीच ऑफ येत होता.
हादरलेल्या शेतकर्यांनी गोडावूनवर धाव घेतली. तिथे गेल्यानंतर शेतमाल घेऊन रनमोडे हा पळून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकर्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून चिखली पोलिस ठाण्यात 100 पेक्षा अधिक तर अंढेरा पोलिस ठाण्यांत दिवसभरात 40 ते 50 तक्रारी दाखल झाल्या होत्या.
तक्रारी दाखल करण्याचा ओघ चिखलीसह धाड, अंढेरा पोलिस ठाण्यांत सुरुच होता. चिखली तालुक्यात 500 पेक्षा अधिक शेतकर्यांची शेतमाल खरेदीत फसवणूक झाली. रनमोडे आणि त्याच्या साथीदाराने अंदाजे 10 कोटींपेक्षा जास्त रकमेचा शेतकर्यांना चुना लावला आहे.
तक्रारी दाखल होण्याचा वेग पाहाता, पोलिसांनीही वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याने रनमोडे आणि त्याचे साथीदार जिल्ह्याबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाल्याची शंका निर्माण झाली आहे.
पोलिसांनी तातडीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी पीडित शेतकरी करत आहेत. शेतकर्यांना न्याय मिळाला नाही तर राज्य महामार्गावर रस्तारोको करण्याचा इशाराही शेतकर्यांनी दिला आहे.