चेतन कोळस, झी 24 तास, येवला, नाशिक : निसर्गाची अवकृपा, पिकाला न मिळणारा योग्य दर आणि यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. सरकारच्या आपसातल्या भानगडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यात आता शेतकऱ्यांवर नवं संकट उभ ठाकलंय. अनेक कारणांमुळे राज्यातला शेतकरी पुरता नाडला गेलाय. त्यात व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली पिळवणूक वेगळीच. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन व्यापारी त्यांची कशी लूट करतायेत याचाच एक व्हिडीओ समोर आलाय. झी 24 तासनं याचं इन्व्हेस्टिकेशन करत व्यापाऱ्यांचा या धंद्याचा पर्दाफाश केलाय. (Tomato farmer cheated by traders in Nashik Pimpalgaon Bazar Samiti)
राज्यातल्या शेतक-यांमागची संकटाची मालिका संपायला तयार नाहीय. भाव नाही म्हणून शेतक-यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांची लूट सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मापात पाप करून व्यापारी आपली तिजोरी कशी भरतायेत त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
पिंपळगाव बाजार समितीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. एका शेतक-यानं इथं विक्रीसाठी टॉमेटो आणले होते. प्रत्येक क्रेटमध्ये 20 किलो टॉमेटो असे 43 क्रेट त्यांनी व्यापा-याला दिले. पण वजनकाट्यावर प्रत्येक क्रेटचं वजन 18 किलोच भरलं. शेतकऱ्याला व्यापाऱ्याची चलाखी लक्षात आली. त्यानं वजनकाटा उलटा करताच व्यापाऱ्यांचं बिंग फुटलं. पाहा वजनकाट्याखाली चक्क दगड लावण्यात आलाय.
झी 24 तासनं या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही बाजार समितीच्या पदाधिका-यांशी संपर्क साधला. त्यांनी याप्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत संबंधित व्यापाऱ्यावर जप्तीची कारवाई केली.
आधीच अतिपावसामुळे आणि पडलेल्या भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यात व्यापाऱ्यांनी सुलतानी लूट सुरू केलीय. त्यामुळे पणन खात्यानं याची गंभीर दखल घेऊन अशा लुटारू व्यापाऱ्यांचा परवानाच रद्द करण्याची कारवाई करायला हवी.