मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने या दोन्ही गाड्यांना प्रवाशांची चांगली पसंती मिळाली. तेजस एक्स्प्रेसची नवी वेळ बदल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. तसेच दोन्ही गाड्यांचे बदललेले वेळापत्रक पुन्हा वाढविण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या नव्या वेळापत्रकाचे स्वागत केलेय. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सोडण्यात येणाऱ्या डबल डेकरचीही वेळ बदलण्याची मागणी होत आहे.
मुंबई - करमाळी तेजस एक्स्प्रेस आणि दादर - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळांमध्ये रविवार, २ डिसेंबर ते २ जानेवारी २०१९पर्यंत बदल करण्यात आला होता. आता हे वेळापत्रक ९ जून २०१९पर्यंत वाढविण्यात आलेय. त्यामुळे प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तेजस एक्स्प्रेस या गाडीला सुरुवातीला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, वेळ बदल्यानंतर या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात डबल डेकर या गाडीच्याही वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. या गाडीची वेळ सकाळी ६.३० नंतर करण्यात यावी. त्यामुळे याही गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल.
तेजस एक्स्प्रेस (२२११९) ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पहाटे ५ ऐवजी पहाटे ५.५० वाजता सुटेल. ही गाडी नवीन वेळेनुसार दादर येथे सकाळी ६ वाजता, ठाण्यात सकाळी ६.२५ वाजता, पनवेल येथे स. ७ वाजता आणि करमाळीस पूर्वीच्या दुपारी १.२० ऐवजी २ वाजता पोहोचेल.
परतीच्या मार्गावर ही गाडी करमाळीहून पूर्वीच्या दुपारी २.३० ऐवजी दुपारी २.४० वाजता सुटेल. ही गाडी पनवेलला रात्री ९.४५ वाजता, ठाण्यात १०.३० वाजता, दादरला रा. १०.५० वाजता, सीएसएमटी येथे रात्री ११.१५ वाजता पोहोचेल.
जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५१) ही सध्याच्याच वेळेनुसार पहाटे ५.२५ वाजता सुटून मडगाव येथे दुपारी २.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर ही एक्स्प्रेस मडगावहून दुपारी २.३० ऐवजी दुपारी २.४० वा. सुटून पनवेलला रात्री. १०.०५ वाजता, ठाण्यात रात्री १०.५० वाजता तर दादरमध्ये रात्री ११.१५ वाजता पोहोचेल.