प्रवीण नलावडे, झी मीडिया,नायगाव-वसई : एक मुलगा रात्री अडीज वाजता निर्जन रस्त्यावर चालत निघाला. घरच्यांची रात्री शोधाशोध सुरु झाली. गस्तीवरच्या पोलीसांनी त्या मुलाला सुखरुप पालकांपर्यत पोहोचवले.. पण यानिमित्ताने झोपेत चालणा-या मुलांची आता पालकानीच धास्ती घेतलीय..पाहुयात वसईतला हा प्रकार
काळ्याकुट्ट अंधारात, भयाण शांततेत रस्त्यावर चालणारा हा लहान मुलगा पाहा.. इतक्या रात्री अडीच वर्षाचा हा मुलगा निर्जन रस्त्यावर चालत चाललाय... किर्रर अंधार अन् रस्त्यावरील कुत्र्यांची या मुलाकडे नजर बघा... असं असतानाही या पठ्ठ्याला कशाचीही भीती नसल्याचे या दृष्यांवरुन पाहायला मिळतंय.
नायगावच्या खोचिवडे गावातील ऑस्टिन आणि हर्षदा कोळी यांचा अडीच वर्षाचा नॅथलिन.. रात्रीचे अडीच वाजून गेल्यानंतरही नॅथलिन झोपलेला नव्हता. घरातील सगळेजण गाढ झोपेत असताना नॅथलिनने बेडरुमच्या दरवाजाची कडी उघडली. यानंतर मेन दरवाजाची कडी त्याने उघडली. अखेर पायरी जवळच्या लोखंडी दरवाजाची कडी उघडत नॅथलिन घराबाहेर पडला.
रात्री अडीचला घराबाहेर पडलेल्या नॅथलिननं अंधार आणि कुत्र्यांची तमा न बाळगता सुमारे 2 किमी अंतर पार केलं. त्यानंतर रस्त्यावरील दोघांनी त्याला हटकलं. शेजारच्या घरी नेलं मात्र ते मुलं त्याचं नसल्याचं लक्षात आलं. तेवढ्यात सुदैवाने गस्तीवरील पोलीस तिथं पोहचले. त्यांनी नॅथलिनला आपल्या ताब्यात घेतलं. काही विचारलं तरी तो काहीही बोलतचं नव्हता. अखेर त्याला पोलीस ठाण्यात नेऊन खाऊ-पिऊ दिलं. नॅथलिनचा फोटो काढून, व्हॉटस अपवर सर्वांना आवाहन करण्यात आलं.
रात्रीच्या वेळी नॅथलिन गायब झाल्याने त्याच्या घरच्यांची झोप उडाली होती. संपूर्ण गाव पालथं घातल्यानंतर त्याचा शोध लागला नाही. अखेर व्हॉट्सअॅवरील फोटो पाहून त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि तिथं नॅथलिनला पाहून सगळ्यांचाच जीव भांडयात पडला.
गस्तीवरील पोलिसांनी नॅथलिनला पोलीस ठाण्यात नेलं आणि व्हॉटसअपद्वारे माहिती पसरवली. त्यामुळे मायलेकाची भेट घडवून आणली. मात्र इतक्या रात्री नॅथलिन घराबाहेर का पडला, तो झोपेत चालत बाहेर पडला की यामागे काही आजार आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेत.