अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : सरकारी नोकरीतील कर्मचारी आपल्या विविध कामासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज करतात. ही रजा त्यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी हवी आहे. याच कारणही त्यांना या अर्जात द्यावं लागतं.
अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका पोलीस अंमलदारानेही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुट्टीसाठी असा एक अर्ज केला. मात्र, वरिष्ठाकडे केलेला हा अर्ज चर्चेचा विषय ठरलाय.
जो दिवस वार्षिक कॅलेंडरमध्ये नाही. तो आश्चर्यकारक दिवस त्याला साजरा करायचा आहे. यासाठी त्या पोलीस अंमलदाराने रजा मागितली आहे. हा अर्ज पाहून रजा मंजूर करणारे अधिकारीही चक्रावून गेले होते. हा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मंगळुर दस्तगीर पोलीस ठाण्यात विनोद राठोड हे पोलीस अंमलदार आहेत. त्यांची 27 मार्चला साप्ताहिक रजा होती. पण, 29 मार्चला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी सुट्टी मिळावी असा अर्ज त्यांनी केला.
मात्र, हा अर्ज करताना त्यांनी 29 मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस ( पश्चाताप दिन ) असल्यामुळे 29 मार्चला किरकोळ रजा मंजूर करावी अशी विनंती केलीय. या अंमलदाराने लग्नाच्या वाढदिवसाला चक्क पश्चाताप दिन म्हटल्यानं अधिकाऱ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी क्षणभरातच त्याची सुट्टी मंजूर केली.