अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पगारी नोकरांबद्दल तुम्ही आम्ही सर्वांनीच ऐकलं आहे. पैसे घेऊन काम करणाऱ्यांचीही आपल्याला माहिती आहे. मात्र नागपूरमध्ये पगार घेऊन काम करणारे असे काही जण समोर आले, की त्यामुळे सारेच चक्रावले. बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणारी एक टोळी नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होती.
या प्रकरणी धंतोली पोलिसांनी नेताजी मार्केट भागातून आफताब इब्ररार अन्सारी याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर, आफताब अन्सारीनं मोबाईल चोरीची कबुली दिली. सोबतच झारखंडहून मोबाईल चोरीसाठी नागपुरात आलेल्या आठ चोरांची नावंही त्यानं सांगितली.
चोरलेले मोबाईल ही टोळी झारखंडला पाठवायची आणि तिथून बांग्लादेशला त्यांची तस्करी केली जायची. कारण या टोळीचा म्होरक्या झारखंडला असतो. तो मोबाईल चोरी करण्यासाठी या चोरांना कामानुसार पगारही द्यायचा. तसंच नागपूर शहरात या चोरांना पाठवल्यांतर पगाराबरोबरच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही हा म्होरक्या करायचा.
झारखंडची ही टोळी नागपुरात खास चोरी करण्यासाठी दाखल झाली होती. त्याकरता त्यांनी जोगीनगर इथे रुमही भाड्यानं घेतली होती. सहा चोरांसह दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून आठ मोबाईलही जप्त केले.
झारखंडच्या टोळीतल्या या चोरांना कामानुसार पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत मोबदला पगार स्वरुपात मिळत होता. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख २१ हजारांचे मोबाईल जप्त केले आहेत.