गोपीनाथ मुंडेंचा मोठेपणा आजच्या कोत्या मनाच्या नेत्यांमध्ये नाही- खडसे

चूक नसताना मी वनवास भोगतोय, माझ्या आयुष्यातील चार वर्षे खराब झाली.

Updated: Dec 12, 2019, 12:46 PM IST
गोपीनाथ मुंडेंचा मोठेपणा आजच्या कोत्या मनाच्या नेत्यांमध्ये नाही- खडसे title=

परळी: गोपीनाथ मुंडे यांच्या ठायी असलेला मोठेपणा आजच्या कोत्या वृत्तीच्या नेत्यांमध्ये नाही, अशी जळजळीत टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. एकनाथ खडसे हेदेखील याठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, गोपीनाथ मुंडे असते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. चूक नसताना मी वनवास भोगतोय, माझ्या आयुष्यातील चार वर्षे खराब झाली. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे मोठ्या मनाचे नेते आज पक्षात राहिलेले नाहीत. जे मोठे नेते आहेत त्यांना दूर केले जात आहे, असा आरोप यावेळी खडसे यांनी केला. 

भाजपमध्ये ओबीसींचं खच्चीकरण - प्रकाश शेंडगेंचा आरोप

तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या काळात आम्ही हसतखेळत राजकारण केले. त्यावेळी मी नवखा होतो. त्यामुळे माझ्याकडून अनेक चुका होत असत. मी अनेकांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरायचो. त्यामुळे मला सभागृहातून निलंबितही करण्यात आले होते. मात्र, अशावेळी गोपीनाथ मुंडे पुढाकार घ्यायचे. वेळ पडल्यास मी तुमचे पाय धरतो, अशी विनवणी समोरच्या व्यक्तीला करत. माझा हा नेता आज माझ्यासोबत नाही, याची खूप खंत वाटते, असे खडसे यांनी सांगितले. 

मी बदमाश आहे तर माझी बदमाशी सांगा ना, आम्हाला दूर करता आणि ठग लोकांना जवळ करता. रात्रीच्या अंधारात काय सुरु आहे, ते जगाला माहिती आहे. मात्र, यामुळे पक्षाची अधोगती होतेय याचे दुःख वाटते. आज गोपीनाथराव असते तर हा पक्ष आम्ही आणखी मोठा केला असता, अशी भावना यावेळी खडसेंनी व्यक्त केली.