धक्कादायक, मालेगावात आरोग्य संदर्भातील साहित्याचे वाटपच नाही

  कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनाविरोधात लढण्यासाठी साहित्याचे वाटपच झाले नसल्याचं आयुक्तांच्या पाहाणीत उघड झाले आहे. 

Updated: May 6, 2020, 02:06 PM IST
धक्कादायक, मालेगावात आरोग्य संदर्भातील साहित्याचे वाटपच नाही title=

नाशिक : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनाविरोधात लढण्यासाठी साहित्याचे वाटपच झाले नसल्याचं आयुक्तांच्या पाहाणीत उघड झाले आहे. आरोग्यसेवेतील डॉक्टर, सफाई कर्मचारी  यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने पीपीई किट आणि सुरक्षा साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य वाटप झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

मालेगावात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य विभागाने येथे जातीने लक्ष दिले आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिकचा दौरा करत मालेगावाला भेट देऊन संबंधिताना सूचना केल्या होत्या. या ठिकाणी कोरोनाची साखळी वाढत असल्याने चिंता करण्यात येत होती. तसेच आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर यांनाही कोरोनाची  बाधा झाली होती. असे असताना आरोग्य सुरक्षा साहित्य येथे येऊनही त्यांचे वाटपच झाले नव्हते, ही गंभीर बाब पुढे आली.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तक्रार

दररम्यान,  हे साहित्य मिळाले नसल्याची तक्रार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केल्याने आयुक्त त्र्यंबक कासार यांनी माहापालिकेच्या अधिकारी आणि डॉक्टरसह महापालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षात जाऊन पाहणी केली असता साडेतीन हजार पीपीई किट, २०  हजार मास्क , दोन  हजार एम-९५ मास्क ,फेसशिल्ड मास्क , सानेटायझर , थर्मल मीटर,औषधी गोळ्या  असे  सामान गोदामात पडून असल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

भांडारपाल राहुल ठाकूर आणि कदीर नामक कर्मचऱ्यावर साहित्य वाटपाची जबाबदारी होती. दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

 अर्चना त्यागी मालेगावात

मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील सुरक्षेची अतिरिक्त मदार असलेल्या एसआरपीएफ प्रमुख अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी आज मालेगावात येत असून एसआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाधीत होत आहेत. मालेगावात तैनातीस असलेले ३५ तर मुंबईत तैनात असलेले ४८ जण जण कोरोनाबाधित झाले आहेत. एस आर पी एफ जवान बाधित होण्याचा सिलसिला सुरुच असल्याने आज त्याचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.