कल्याण-डोंबिवली प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगिती; एकनाथ शिंदेंचे केडीएमसीला आदेश

कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांच्या सीमाबंदी निर्णयाला स्थगिती

Updated: May 6, 2020, 02:38 PM IST
कल्याण-डोंबिवली प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगिती; एकनाथ शिंदेंचे केडीएमसीला आदेश title=
संग्रहित फोटो

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली शहरांत येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र आता या प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगित देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीला हे आदेश दिले आहेत. 

कल्याण-डोंबिवली शहरांत राहणाऱ्यांना सीमाबंदी करुन त्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईत, कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांजवळ करण्याची विनंती महापालिकेला करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. 8 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र आता या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

सध्या कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची सोय करण्यास काही अवधी लागू शकत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासला दिली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांची मुंबईत व्यवस्था करण्यासाठी अवधी लागत असल्याने यावर तोडगा निघेपर्यंत सीमा प्रतिबंधित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती kdmc.covid19.gov@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी. त्यानंतर ही माहिती मुंबई महापालिकेत सादर करण्यात येणार आहे.