देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 7, 2017, 05:00 PM IST
देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार title=

कर्जत (रायगड) :  सत्तेचे केंद्रीकरण झाले की ती भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

सरकारला कृषीविषयक धोरण नाही

विद्यमान सरकारकडे कृषीविषयक धोरणाचा अभाव असल्याचे स्पष्ट करत कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा अपमान केला जातोय, असा घणाघात पवारांनी या वेळी केला. शेतकरी आत्महत्येबाबत मजबूत धोरण घेणं गरजेच आहे. पण, विद्यमान सरकार हे धोरण राबवत नाही. विद्यमान सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे. इतकेच नव्हे तर, सरकारच्या कर्जमाफीचा दीर्घ मुदतीच्या कर्जधारक शेतकऱ्यांना फायदा नाही, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

सरकारमध्ये निर्णयांचे केंद्रीकरण झाले आहे

या वेळी बोलताना पवार यांनी सरकारवर आपल्या खास संयत शैलीत हल्ला चढवला. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा अनुभव पवार यांच्या भाषणातून डोकावताना स्पष्ट जाणवत होता. भाषणाची सुरूवात करतानाच पवार यांनी जनता पक्षांबाबतचा अनुभव सांगितला. एकवाक्यतेचा अभाव असल्यामुळे जनता पक्षाचे सरकार गेले. तर, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वैशिष्ट्यांमुळे अटलबिहारी वायपेयींचे सरकार सत्तेची पाच वर्षे पूर्ण करू शकले. मात्र, सध्या देशात वेगळेच  चित्र दिसत असून, निर्णयांचे केंद्रीकरण झाले आहे, असा टोला पवार यांनी भाजप सरकारला लगावला.

सत्तेचे केंद्रीकरण भ्रष्टतेकडे वाटचाल करते

सत्तेचे काही गुण असतात तसेच तिचे काही दोषही असतात.  केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील सरकारांचा अभ्यास केला असता प्रामुख्याने एक गोष्ट पुढे येते. ती म्हणजे, सत्तेचे केंद्रीकरण झाले की ती भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असे वातावरण तयार झाले आहे, असेही पवार या वेळी म्हणाले.