सिंधुदुर्गातील ही चोरी म्हणजे जणू काही चित्रपटाची कथाच...

चोरी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील पण नुकतीच सिंधुदुर्गात घडलेली घटना ही चित्रपटातील दृश्याप्रमाणेच आहे

Updated: Sep 29, 2022, 10:31 AM IST
सिंधुदुर्गातील ही चोरी म्हणजे जणू काही चित्रपटाची कथाच... title=

सिंधुदुर्ग : चोरी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील पण नुकतीच सिंधुदुर्गात घडलेली घटना ही चित्रपटातील दृश्याप्रमाणेच आहे. एक जोडपं रिक्षावाल्याकडे प्रावस करण्यासाठी मागणी करतं प्रावसाला सुरुवात करतं आणि नंतर असं काही घडलं की रिक्षावाल्याला गुंगीचं औषध देऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह तब्बल 84 हजार 500 रुपयांची लूट करतं. ही कुठली कथा नाही, हा प्रत्यक्षात घडलेला प्रकार असून, याप्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी म्हणजेच 26 सप्टेंबरला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक जोडप्याने यांच्याकडे तळेबाजारला प्रवासासाठी मागणी केली. 'आम्हाला तळेबाजारच्या भावी देवी मंदिराकडे जायचं असल्याचं त्या जोडप्याने रिक्षाचालक तळेकर यांना सांगितलं'. त्या जोडप्यातील पुरुषाचं वय साधारण 35 ते 40 वर्ष तर महिलेचं वय 25 ते 30 वर्ष होतं. तर त्यांच्या सोबत सुमारे दोन ते अडीच वर्षाचा एक लहान मूल देखील होतं. यावेळी त्या जोडप्याने, 'आम्हाला तळेबाजार येथे भावी देवी मंदिराकडे जायचे असल्याच रिक्षाचालक तळेकर यांना सांगितलं.' असं फिर्यादीमध्ये संजय तुकाराम तळेकर यांनी सांगितलं आहे.

'आम्हाला मुल व्हावं म्हणून माझ्या मित्राने देवीकडे मन्नत मागितली होती आणि ती पूर्ण झाल्याने आम्ही नारळ आणि पेढे ठेवून नमस्कार करुन निघत असताना आम्हाला आता कुणकेश्वरला जायचं आहे,' असं त्या पुरुषाने रिक्षाचालकाला सांगितलं. यावेळी रिक्षाचालकाने रिक्षा देवगड रोडच्या दिशेने घेतली.

'आम्ही गणपतीपुळे येथील देवदर्शनाचा पेढा आणलेला आहे तो घ्या असं सांगत रिक्षा चालक तळेकर यांना पेढा दिला. त्यानंतर देवगड जामसडे येथे रिक्षा आली असता या जोडप्याने रिक्षा एका टपरी जवळ थांबवण्यास सांगितली आणि त्या जोडप्याने एक कोल्ड्रिंकची बाटली आणून दिली. कोल्ड्रिंग प्यायल्यानंतर आम्हाला कुणकेश्वर येथे जायचं नाही असं सांगत त्या जोडप्याने रिक्षाचालकाला आम्हाला पुन्हा तळेरे स्टॅन्डला सोडा अस सांगितलं. त्यानंतर नेमकं पुढे काय घडलं हे मला आठवत नसल्याचं रिक्षाचालक तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

कणकवलीत एका खाजगी रुग्णालयात रिक्षाचालक तळेकर यांना उपचाराकरता दाखल करण्यात आलं. तळेकर यांना बुधवारी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण शुद्ध आली त्यावेळी त्यांना आपण लुटलो गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 20 ग्रॅमची सोन्याची चैन, चार सोन्याच्या अंगठ्या, 8 हजार रोख रक्कम आणि एक सोनाटा गोल्डन घड्याळ असा एकूण 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल त्या जोडप्याने लंपास केल्याची फिर्याद तळेकर यांनी दिली आहे. 

फिर्यादेनुसार, संशयित जोडप्याच्या विरोधात कलम 328, 379, 34 नुसार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर, तळेरे स्टॅन्ड येथे रिक्षात बसतानाचा या जोडप्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ आता समोर आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ...