नवी मुंबई : आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरंय... तुमच्या घरी येणाऱ्या गॅस सिलिंडरमधून गॅसची कशी चोरी होतेय, हे झी २४ तास आज तुम्हाला दाखवणार आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्या तिघांना नवी मुंबईच्या सानपाडा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. हे तिघेही गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉय आहेत. गेल्या सोमवारी रात्री भररस्त्यात ते भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस चोरी करत होते. पोलीस नाईक भाऊसाहेब होलगीर यांनी त्यांची ही चोरी पकडली आहे.
सानपाडा सेक्टर 5 इथं रस्त्यालगत आडोशाच्या ठिकाणी गॅस एजन्सीचा टेम्पो उभा होता. त्याठिकाणी गॅसची दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी टेम्पोत डोकावून पाहिलं, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. गॅस चोरी करणाऱ्या तिघा डिलिव्हरी बॉयना पोलिसांनी अटक केली... तर दोघेजण मात्र पळून गेले.
खरं तर गॅसचोरी करणाऱ्यांचं हे कृत्य जीवघेणं देखील ठरू शकलं असतं... कारण गॅसचोरी करताना तिथं स्फोट होण्याची देखील भीती होती... त्यातून मोठी दुर्घटना घडू शकली असती...
आधीच गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्यात... त्यात आता गॅसचोरीचे असे प्रकार उघडकीस आलेत.. आजवर अशाप्रकारे अनेक ग्राहकांची फसवणूक झालीय. तुमची फसवणूक होऊ नये, असं वाटत असेल तर घरी गॅस सिलेंडर येईल तेव्हा तो नीट तपासून घ्यायला विसरू नका...
तळे राखी तो पाणी चाखी.. असं म्हणतात. पण इथं गॅस डिलिव्हरी करणारेच गॅस चोर निघाले आहेत. एका पोलिसाच्या दक्षतेमुळं हा प्रकार उघड झाला. पण ग्राहकांनी देखील स्वतःची फसवणूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.
बातमीचा व्हिडिओ