कोल्हापूर पोलीस स्थानकावर चोरांचा डल्ला, 21 लाखांचा गंडा

पोलीस स्टेशनमध्येच चोरी झाल्याने खळबळ 

Updated: Jan 12, 2020, 08:56 AM IST
कोल्हापूर पोलीस स्थानकावर चोरांचा डल्ला, 21 लाखांचा गंडा  title=

कोल्हापूर : रविवारी सकाळी एक अजब घटना घडली आहे. चक्क चोरांनी पोलीस स्थानकातच डल्ला मारला आहे. कोल्हापूरयेथील जयसिंगपूर पोलीस स्थानकातच चोरांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस स्टेशनच सुरक्षित नसेल तर सामान्यांनी कसं राहावं? असा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच पोलिसांचा निष्काळजीपणा भोवला का? असा सवाल देखील विचारला जात आहे. 

जयसिंगपूर पोलीस स्थानकातून चोरांनी चक्क 185 मोबाईलसह 7 लाखांचा रोकड लंपास केली आहे. 185 मोबाईलसह इतर ऐवजचा विचार करता हा सगळा माल 14 लाखांच्या घरात होता. म्हणजे चोरांनी पोलिसांनाच तब्बल 21 लाखांच्या ऐवजाला गंडा मारला आहे. या घटनेने सगळीकडेच चर्चा होत आहे. 

पोलिसांचा निष्काळजीपणाच भोवला असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आपण पोलिसांना गंडवू शकतो तर सामान्यांना का नाही? असा चोरांचा असलेला विचार यामधून समोर येत आहे. जयसिंगपूर पोलीस स्थानकात वेगवेगळ्या घटनेत किंवा तपासात हाती आलेले 185 मोबाईल होते. आणि 7 लाखांची रोकड होती. पोलिस स्थानकात एवढा ऐवज आणि रोकड का ठेवण्यात आली होती? असा देखील सवाल केला जात आहे. 

पोलीस स्थानकात झालेल्या चोरीत किती चोरांचा समावेश आहे हे अद्याप कळलेलं नाही. किंवा चोरीचे इतर तपशिल देखील अद्याप हातील आलेले नाही. मात्र या घटनेने सामान्यांना अधिकच सावध केलं आहे.