पावसाचा अंदाज, हवामान खात्यानं घालवली लाज! पाऊस गायब झाल्यानं बळीराजा हवालदिल

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली, पण पावसाने दडी मारल्याने पेरलेलं उगवलंच नाही

Updated: Jul 5, 2021, 09:06 PM IST
पावसाचा अंदाज, हवामान खात्यानं घालवली लाज! पाऊस गायब झाल्यानं बळीराजा हवालदिल  title=

मुंबई : जून महिन्याच्या सुरूवातीला मनसोक्त बरसणारा पाऊस आता कुठे दडी मारून बसलाय हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी पण आता पश्चातापाची वेळ आलीय. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि अकोला या 4 जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. इथं 50 टक्के कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. आता सगळ्यांच्याच नजरा वळल्या आहेत त्या हवामान विभागाकडे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचा दावा करणाऱ्या हवामान विभागाचे अंदाज चुकतातच कसे असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित होतोय. 

राज्यातला शेतकरी हवालदिल

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली. पण गेल्या पंधरा दिवसात पावसाने दडी मारल्याने पेरलेलं उगवलंच नाही, अशी तक्रार शेतकरी करतायत.

यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला होता. जुनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी आनंदित झाला. राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. आता जुलै महिना उजाडला, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलं आहे. तसंच येत्या दोन – चार दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास पिके सुकू शकतात. त्यामुळे मायबाप शेतकरी हा चिंतेत सापडला आहे.

 IMD अधिकाऱ्यांची सारवासारव 

हवामान विभागाच्या काराभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर IMDच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव सुरू केली आहे.  पावसाबाबत 15 दिवसांचा अंदाज वर्तवणं अत्यंत कठिण आहे असं IMDचं म्हणणं आहे. हवामानबाबत 100 टक्के अचूक अंदाज वर्तवणारी कोणतीही यंत्रणा नाही. पावसाचा अंदाज वर्तवताना तंत्रज्ञानाला अनुभवाची जोड असणं आवश्यक आहे. हवामानात अचानक होणाऱ्या बदलामुळे 24 तासांपूर्वी वर्तवण्यात आलेला अंदाजही अचूक ठरण्याची शक्यता कमी असते असं अजब स्पष्टीकरण IMDनं दिलंय. 

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. जगातील अनेक प्रगतशील देशांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं बऱ्यापैकी अचूक अंदाज वर्तवण्यात यश आलंय. मात्र भारतीय हवामान खात्यानं अद्याप तशी प्रगती साधलेली दिसून येत नाही. पावसाबाबत वर्तवण्यात आलेले तकलादू अंदाज शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असतील तर अशा यंत्रणांवर कितपत विश्वास ठेवावा हाच खरा प्रश्न आहे.