मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी मोठा निर्णय; दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी थेट फर्मान काढले

दाऊदी बोहरा समाजाच्या लहान मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदीचां निर्णय घेतला आहे. मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून बोहरा समाजाने 15 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल वापरण्यावर मनाई केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 30, 2024, 06:31 PM IST
मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी मोठा निर्णय; दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी थेट फर्मान काढले title=

Pune News : आजकाल अशी वेळ आलीय. की आपण एक दिवस न जेवता राहू शकतो. पण मोबाईल हातात न घेता आपल्याला अर्धा दिवसही राहावणार नाही. याच मोबाईलचं व्यसन लहान मुलांमध्येही बघायला मिळतंय. आणि म्हणून पुण्यातल्या एका समाजानं अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतलाय. 15 वर्षाखालील मुलांच्या हातात मोबाईल नको असं फर्मानच  बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी काढले आहे. मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल.. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेत. अगदी लहान मुलंही मोबाईलच्या व्यसनातून सुटलेली नाहीत. या मुलांकडून जेवताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, अगदी झोपतानाही मोबाईलचा वापर होतो. यामुळं ना मुलांना बाहेर जाऊन खेळण्यात रस राहिलाय. ना पुस्तक हातात घेऊन शिकण्यात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन पुढच्या पिढीला नीट वळण लावण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी 15 वर्षाखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका, असं फर्मान काढलंय. त्यांनी मुंबईत झालेल्या व्याख्यानात यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. 

बोहरा धर्मगुरुंची ही माहिती पालकांनी आपल्य़ा मुलांना सांगितली. याचा परिणाम पुण्यात बोहरी आळीत दिसूही लागलाय. मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांच्या डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोच. पण पुढे जाऊन मुलांच्या मानसिक जडणघडणीवरही दुष्परिणाम होतोय. याबाबत अनेक सर्वेक्षणं आणि अभ्यासही झालेत. 15 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करायचं असेल तर त्यांना मोबाईलपासून लांब ठेवणं अत्यावश्यक असल्याचं मानसोपचार तज्ज्ञही सांगतात.