बायकोसोबत लग्न करण्यासाठी पतीचा दबाव, एकाची आत्महत्या

 बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका व्यक्तीने आपल्या बायकोसोबत तू सतत बोलतोस त्यामुळे तू तिच्याशी लग्न कर असा दबाव टाकल्याने एका युवकाने आत्महत्या केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 11, 2017, 01:21 PM IST
बायकोसोबत लग्न करण्यासाठी पतीचा दबाव, एकाची आत्महत्या title=

सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका व्यक्तीने आपल्या बायकोसोबत तू सतत बोलतोस त्यामुळे तू तिच्याशी लग्न कर असा दबाव टाकल्याने एका युवकाने आत्महत्या केली आहे.

ही घटना बार्षी तालूक्यातील वाणेवाडी येथे घडली. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव प्रदीप सुनील यादव (वय२३) असे आहे. पीडित सुनीलने कमरेला दगड बांधून विहिरीत उडी घेतली आणि आत्महत्या केली. रविवारी ( 8 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ही घटना वाणेवाडी परिसरात उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, नारायण शंकर लोखंडे यांनी पांगरी पोलीसात खबर दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 

सुरूवातील पोलीस दप्तरी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र,त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत श्रीराम जाधवर व त्यांची पत्नी (रा. विठ्ठलनगर,बार्षी) यांनीच सुनील यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही तक्रार पीडित मयत सुनील जाधव यांचे वडील भागवत यादव (वय ५२) यांनी पांगरी पोलीसात तक्रार दिली आहे.

भागवत यादव यांनी दिलेल्या तक्रारीत उल्लेख केल्यानुसार, भागवत यादव यांचे शेजारी श्रीराम जाधवर यांनी रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फोन करून बोलवून घेतले. त्यावेळी त्याने 'तू माझ्या पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याने तू माझ्या पत्नीबरोबर लग्न कर', असा दबाव सुनीलवर टाकला. या वेळी श्रीराम जाधवर याच्या पत्नीनेदेखील 'तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले आहे. मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे', असे सांगितले. तसेच, दोघा पतीपत्नीने मिळून सुनीलवर दबाव टाकला असा आरोप भागवत यादव यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत पांगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे करत आहेत.