कल्याण : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पंजाब मेल कसाऱ्याहून मुंबईकडे येत असताना सकाळी साडेसातच्या सुमारास इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे कसारा-मुंबई लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली असून नोकरदारांचे हाल होत आहेत.
या मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्याही एकाच ठिकाणी खोळंबून राहिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने इंजिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. मात्र, त्यात यश आलेले नाही. त्यामुळे दुसरे इंजिन मागविण्याबाबत विचार सुरु आहे. त्यानंतर ही मेल पुढे आणावी लागणार आहे. यासाठी लागणारा कालावधी जास्त असल्याने रेल्वे सेवा सुरळीत होण्यास अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.
दादर-बदलापूर एक जाणारी एक येणारी फेरी, दादर-टिटवाळा एक जाणारी एक येणारी फेरी, दादर-डोंबिवली तीन जाणाऱ्या तीन येणाऱ्या फेऱ्या, कुर्ला-कल्याण तीन-तीन येणाऱ्या फेऱ्या अशा 16 वाढीव फेऱ्या असतील. या वाढीव गाड्यांमध्ये महिलांसाठी तीन जादा डबे राखीव असतील.