कोविड सेंटर उद्घाटनाची घाईच झाली; महापौर मुरलीधर मोहोळ यांची कबुली

यंत्रणा सक्षम नसल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला.

Updated: Sep 3, 2020, 05:33 PM IST
कोविड सेंटर उद्घाटनाची घाईच झाली; महापौर मुरलीधर मोहोळ यांची कबुली title=

पुणे : यंत्रणा सक्षम नसल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला असून उद्घाटन करण्याची घाईच झाल्याची कबुली पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. यावेळी PMRDला 25 टक्के रक्कम देण्यापर्यंत आमचा रोल होता असं म्हणून महापौरांनी प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी झटकली. इतकंच नव्हे PMRDकडे याची जबाबदारी असून त्यांच्या कोर्टात मुर्दाड व्यवस्थेचा चेंडू ढकललाय. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड, शंभर टक्के असतील तरच सुरु करायला हवं होतं असं म्हणत सरकारवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

जम्बो हॉस्पिटलमध्ये ज्या फॅसिलिटी आता खऱ्या अर्थाने उपलब्ध हव्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, उद्घाटन करण्याची घाई लवकर झाली. येथे ज्या यंत्रणा कार्यान्वित होण्याची आवश्यकता होती, तो पुरेसा वेळ मिळाला नाही, आणि यात त्रुटी राहिल्या, त्यात नाहक लोकांचे मृत्यू होतात हे वास्तव आहे अशी कबुली महापौरांनी दिली आहे. 

दरम्यान, पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रायकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नसतील तर काय उपयोग असा उद्विग्न सवाल रायकर कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. 

पालकमंत्री अजित पवारांनी माध्यमांकडून यासंदर्भातील प्रश्न विचारला जाताच त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली.