वाह रे वा! सर्वसामान्यांचा दांडिया बेकायदेशीर आणि महापौरांचा कसा कायदेशीर?

लोकप्रतिनिधींना कोरोनाचे नियम नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारल जात आहे

Updated: Oct 11, 2021, 04:18 PM IST
वाह रे वा! सर्वसामान्यांचा दांडिया बेकायदेशीर आणि महापौरांचा कसा कायदेशीर? title=

पिंपरी-चिंचवड : कोरोनामुळे राज्यात गरबा, दांडियाला बंदी आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) महापौरांनी नियमांना हरताळ फासत थेट महापालिकेच्या प्रांगणातच ठेका धरला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आज 39 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त महापालिकेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

त्यात खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे (Usha Dhore)आणि उपमहापौर हिराबाई घुले यांनी चक्क गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे यावेळी कोरोना नियमांचं कोणतंही पालन दिसून आलं नाही. कोरोनामुळे राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. गरबा, दांडिया खेळू नये असे आदेश आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच नियम पायदळी तुडवट असल्याचं पाहायला मिळतंय. 

याबाबत महापौरांकडे विचारणा केली असता त्यांनी सारवासारव केली. गरबा नाहीए, फक्त पैठणीचा खेळ आहे, आणि महिला कर्मचाऱ्यांपूरताच आहे, खूप काही गर्दी नाही, हौस म्हणून महिलांना वाटलं की तुम्ही सहभागी व्हावं म्हणून दोन मिनिटं सहभाग घेतला असं उत्तर महापौर माई ढोरे यांनी दिलं.