Maharashtra Bandh : राज्यात महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ‘ही’ भूमिका

भाजपविरोधात सर्वजण एकवटले... 

Updated: Oct 11, 2021, 10:32 AM IST
Maharashtra Bandh : राज्यात महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ‘ही’ भूमिका  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारामध्ये शेतकऱ्यांची चिरडून हत्या करण्यात आली. ज्यानंतर देशभरातून तीव्र नाराजीचा सूर आळवण्यात आला. पाहता पाहता ही लाट राज्यातही पोहोचली आणि सोमवारी सत्ताधारी महाविकासआघाडीच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र बंद पाळण्यास सुरुवात झाली.

सोमवारी सकाळपासूनच याचे परिणाम दिसून येऊ लागले. मायानगरी मुंबईमध्ये सुरुवातीचे काही तास बंदचे परिणाम दिसून आले नसले तरीही कालांतरानं रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये असणारा शुकशुकाट बरंच काही सांगून गेला. मुंबईतील धारावी शिवाजी नगर, मालवणी या परिसरांमध्ये जवळपास 8 बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली. तर, ठाण्यामध्ये दुकानं बंद करण्याची मागणी करत महाविकासआघाडीचे नेते रस्त्यांवर उतरल्याचं पाहायला मिळालं.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला चार शेतकऱ्यांसमवेत आठजणांचा मृत्यू झाला होता. भाजप कार्यकर्त्यांना नेणाऱ्या वाहनांनी धडक दिल्यामुळे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं. सदर घटनेनंतर संतप्त जमावानं वाहनांमध्ये असणाऱ्यांना मारहाण केल्यामुळं त्यापैकी काहीजणांचा मृत्यू झाला होता.

नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं काढली. तर तिथे कोल्हापूर बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शिवसैनिकांनी अडवला. औरंगाबादमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न करत केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काही ठिकाणी सर्वसामान्यांचा बंदला विरोध पाहायला मिळाला तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुपारी चार पर्यंत बंदला बाठिबा देण्याचं ठरवलं. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये शुकशुकाटाचं चित्र दिसून आलं. दरम्यान, लोकल सेवेवर मात्र बंदचा कोणताही परिणाम नाही हेच स्पष्ट झालं.

असं असलं तरीही महाराष्ट्र बंद असल्यामुळं नागरिकांची संख्या कमी दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हत्येचा निषेध झाला पाहिजे पण हिंसेच्या मार्गानं नको अशी मागणी सर्वसामान्यांनी केली आहे. तर, बंदचा मार्ग योग्य असून हा बंद यशस्वी झालाच पाहिजे असं म्हणज शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ अनेकांनीच सूर आळवला आहे. बंदची हाक दिल्यानंतर राज्यात काही ठिकाणी महाविकास आघाडीकडून दुकानं बंद करण्यासाठी सक्ती करण्यात येतानाचं चित्र राज्यातील काही भागांत दिसत आहे.

इथं महाराष्ट्र बंद असल्यामुळं व्यापार समित्यांवर याचे परिणाम दिसून आले. पण, शिर्डीमध्ये याचा परिणाम दिसून आलेला नाही. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीम्ये भक्तांची रिघ सुरुच असून, भक्तांना अडचण होऊ नये अशीच महाविकासआघाडीच्या नेत्यांनी इथं भूमिका

पुण्याच काय चित्र?

पुण्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला जात आहे. इथं मार्केट यार्ड परिसरात शांततेचं वातावरण आहे. एसटी सेवा सुरळीत सुरु आहे. राज्यातील काही भागात बंदला पूर्ण प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत असून, केंद्राविरोधात अनेक ठिकाणी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.