महाराष्ट्र : बाईकचे इंजिन, ऑटो रिक्षाचे टायर, बॉडी जीपची आणि विशेष म्हणजे या चार चाकी जीपला बाईकसारखीच किक मारावी लागते. ही आगळीवेगळी जीप बनविली आहे सांगलीच्या देवराष्ट्रे गावातील दत्तात्रय लोहार यांनी.
दत्तात्रय लोहार हे अशिक्षित. त्यांचं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप असून त्यांनी जुगाड करुन जीप तयार केली. ही जीप पाहून आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लोहार यांचे कौतुक केले होते. तसेच, या जुन्या जीपच्या बदल्यात त्यांना नवीन बोलेरो देण्याची ऑफर दिली होती.
मात्र, लोहार कुटूंबियांनी घरची लक्ष्मी कशी देऊ असं म्हणत आनंद महिंद्रांची ऑफर धुडकावून लावली होती. त्यावेळी खऱ्या अर्थाने लोहार कुटूंबीय चर्चेत आले होते.
यानंतर आनंद महिंद्रा यांनी “लोहार यांनी निर्माण केलेली ही गाडी महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये आम्हाला प्रेरणा देण्यासाठी संग्राह्य ठेवली जाईल. उपलब्ध गोष्टींमधून अधिक गोष्टी निर्माण करण्याचा धडा आम्हाला ही गाडी पाहून मिळेल' असे सांगितले होते.
आपली गाडी महिंद्रासारख्या कंपनीत संग्राह्य ठेवण्यात येणार आहे. प्रदर्शनाप्रमाणे ती मांडण्यात येणार असल्याने यापासून इतरांना प्रेरणा मिळेल या हेतूने दत्तात्रय लोहार यांनी आपली ती जीप महिंद्रा कंपनीला देण्याचे ठरवले.
लोहार यांच्या या निर्णयाचे स्वागत करत महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोहार यांना नवी कोरी बोलेरो भेट स्वरूपात दिली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काल याबाबत ट्विट करून 'मी नेहमीच दिलेले वचन पाळतो. 'त्याने (दत्तात्रेय लोहार) त्यांच्या कारसाठी नवीन बोलेरो घेण्याची आमची ऑफर स्वीकारली याचा खूप आनंद झाला.
काल, त्यांच्या कुटुंबाला नवीन बोलेरो मिळाली आणि आम्ही मोठ्या अभिमानाने त्यांची निर्मिती घेतली आहे. त्यांचे वाहन आमच्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीतील सर्व प्रकारच्या कारच्या संग्रहाचा भाग असेल आणि आम्हाला साधनसंपन्न होण्यासाठी प्रेरणा देईल, असे म्हटले आहे.
हे ट्विट करताना महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांना महिंद्रा बोलेरो सुपूर्द केल्याच्या कॅप्शनसहीत सांगलीमधील महिंद्रा शोरुमधले फोटोही पोस्ट केले आहेत.