मुंबईच्या या अलिशान हॉटेलमध्ये ठरला अँटिलिया स्फोटाचा भयानक कट

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे

Updated: Mar 22, 2021, 07:55 PM IST
मुंबईच्या या अलिशान हॉटेलमध्ये ठरला अँटिलिया स्फोटाचा भयानक कट title=

 मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. ही स्फोटकं ठेवण्याचा कट मुंबईतील बड्या अलिशान हॉटेलमध्ये ठरला होता.
 
 पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अँटिलिया स्फोटकं प्रकरणात  अटक करण्यात आली. त्यानंतर  राज्यातले राजकारण ढवळून निघाले. याप्रकरणी दररोज नवनविन माहिती समोर येत आहे. 

 सचिन वाझेंच्या संदर्भात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्फोटकं ठेवण्याचा कट हा मुंबईतील अलिशान अशा ट्रायडंट हॉटेलमध्ये शिजला होता अशी माहिती मिळाली आहे.

 NIA च्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान वाझे ट्रायडंटमध्ये राहात होते. NIA नं हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलंय. 
  
 सीसीटीव्हीमध्ये फुटेजमध्ये वाझे 16 फेब्रुवारीला वाझे इनोव्हा घेऊन हॉटेलमध्ये आले. तर 20 फेब्रुवारीला लँडक्रूझर प्राडोमधून ते हॉटेलच्या बाहेर गेले. 
   
 दोन मोठ्या बॅगा घेऊन वाझे हॉटेलमध्ये जात असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. एवढंच नव्हे तर वाझे बनावट आधारकार्ड तयार करुन दुस-याच नावावर ट्रायडंटमध्ये राहात होते.

 या आधार कार्डावर त्यांनी फोटो स्वतःचा लावला होता. मात्र नाव दुसरंच लिहिलं होतं.