प्रशांत परदेशी, झी मीडिया. धुळे : नंदिनी पवार ही अवघ्या १३ वर्षांची चिमुरडी पाणी भरत असताना दगावली. नंदिनी ही हरहुन्नरी मुलगी होती, अभ्यासात प्रचंड हुशार. ऊस तोडणी करायला गेलेल्या आपल्या आई-वडिलांसोबत न जाता अभ्यासासाठी गावातच थांबली होती. पण नंदिनी पाणीटंचाईची बळी ठरली आहे. विशेष म्हणजे एक मुलगी पाणी भरत असताना दगावली याचं साधं सोयरसुतक ही प्रशासनाला नाही.
धुळे जिल्ह्यातील मोरदड तांडा येथील १३ वर्षीय नंदिनी नथु पवार या मुलीचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. मोरदड तांडा गावात तीव्र पाणीटंचाईमुळे येथे प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागतो आहे. त्या संघर्षाचा बळी नंदिनी ठरली आहे. पाणी भरण्यासाठी ती अर्धा किलोमीटर लांब असलेल्या एका खासगी विहिरीवर गेली होती. कठडे नसलेल्या या विहिरीत नंदिनीचा पाय घसरला आणि ती पडली. ५० फूट खोल विहिरीत पडल्याबरोबर दगडाचा कोणा तिच्या डोक्याला लागला आणि त्यातच ती पाण्यात बुडाली.
नंदनीच जाणं हे चटका लावून जाणारं आहे. कारण तिचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. ते रोजगारासाठी बाहेर पडले असता ना ही नंदिनी ही गावातच थांबून शिक्षण घेत होती. तिच्या चार ही बहिणींमध्ये ती अभ्यासात अव्वल होती. खूप शिकायचं आणि आपल्या आई-वडिलांचे कष्ट दुःख दूर करायच असं स्वप्न तिने पाहिला होता. मात्र पाणीटंचाईने तिचा बळी घेतला आहे. आई-वडिलांचा कष्ट दूर करण्याच तिच स्वप्नही आता अधुर राहिल आहे.
मोरदड तांडामध्ये गेल्या चार वर्षांपासून पाणीटंचाई आहे. सततचा दुष्काळ, पाणीपुरवठा योजनेतील राजकीय गोंधळ आणि प्रशासकीय अनास्था अशा तिहेरी दुष्टचक्रात इथली पाणीटंचाई अडकलेली आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गावात फक्त पाण्याची चर्चा राहते. पन्नास रुपयाला १०० लीटर पाणी आणि दीडशे रुपयाला पाचशे लीटर पाणी असे पाण्याचे दर गावात ठरले आहेत. जारचं पाणी पिण्यासाठी, टँकरचे पाणी वापरण्यासाठी आणि जनावरांसाठी वेगळे पाणी विकत घेण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आलेली आहे.
विशेष म्हणजे या सर्व घडामोडींचा मुख्य साक्षीदार प्रशासन आहे. प्रशासनाला गावातील पाणीटंचाई भले भाती माहित आहे. मात्र दोन टँकरने पाणीपुरवठा करून आपली जबाबदारी संपली अशा आविर्भावात प्रशासन आहे. ४००० लोकवस्तीला जिथे दोन लाख लिटर पाण्याची गरज आहे तिथे ५० हजार लीटर पाणी देखील पुरवल जात नाही, ही शोकांतिका मोरदड तांड्याची आहे. प्रशासनाच्या या बिघडलेल्या गणिताचं मोल नंदिताला आपला जीव देऊन चुकून लागला आहे.
पाणीटंचाईने नंदीनी त्याचा जीव घेतला आहे. तिचं जाणं हे सत्ताधारी आणि प्रशासनाचे अपयश आहे. विशेष म्हणजे मोरदड तांडा सारखीच परिस्थिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आहे. नंदिनी सारख्या अनेक मुली आपला जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. नंदिनी प्रमाणे कधी केव्हा कुठे पुन्हा बळी जाईल? हे सांगता येत नाही हे दुर्दैव.