बाबो! दारूड्यांची चक्क टॉवरवर पार्टी, अख्खं गाव जमलं, पोलीसही आले अन्..

दारूसाठी कायपण! चक्क टॉवर रंगली दारुड्यांची झिंगाट पार्टी

Updated: Sep 18, 2022, 10:49 PM IST
बाबो! दारूड्यांची चक्क टॉवरवर पार्टी, अख्खं गाव जमलं, पोलीसही आले अन्.. title=

यवतमाळ:  यवतमाळच्या (Yavatmal) भोसा येथे दोन दारुडे दारू पिण्यासाठी चक्क टॉवरवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्र दारू पिण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते. मात्र, काही इलाज नसल्याने दारुड्यांनी चक्क टॉवरवर बैठक मांडली. नशा चढल्यावर दारुड्यांनी गोंधळ घातला अन् अख्खं गाव गोळा झालं.

नशा चढल्यावर दारुड्यांनी धिंगाणाच घातला. त्यांनी केलेल्या विरुगीने गावालाच वेठीस धरले. अनिकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी त्यांची नावं आहेत. दारु पिल्यानंतर दोघांना झिंग चढली. टॉवरवरून आरडाओरड आणि डायलॉगबाजी सुरू झाल्याने अख्खा परिसर गोळा झाला.

काही वेळातच अख्खं गाव गोळा झालं. दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली. मात्र, दारुडे टॉवरवरून खाली उतरण्यास तयारचं नव्हते. सिनेमातील एक एक डायलॉग म्हणत दारुड्यांनी मोठी गर्दी जमवली. दारुड्यांच्या बचावासाठी पोलिसांना देखील बोलाविण्यात आलं. तरीही काही फरक पडेना... अखेर अग्निशमन दलाला फोन लावण्यात आला.

उंच टॉवरवर चढून अग्निशमन दलाने दोन्ही दारुड्यांना खाली सुखरूप उतरवलं. या संपूर्ण प्रकाराने महिलांनी पोलिसांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. अवैध दारू, गांजा विक्रीचे अनेक अड्डे झाल्यामुळे पुरुषांना, तरुणांना आणि शाळकरी मुलांना दारूचे, गांजाचे व्यसन जडलंय, परिणामी गुन्हेगारी वाढल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे.

काही महिन्यापूर्वीच दारुडे आणि नशा करणाऱ्यांच्या त्रासाने महिला नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता. त्यावेळी देखील कारवाईची मागणी करण्यात आली होती. चार-सहा दिवस पोलिसांनी गस्त केली आणि पुन्हा सर्व प्रकार खुलेआम सुरु झाले. या प्रकारावर पोलिसांनी पायबंद घालावा, असंही स्थानिक महिला म्हणाल्या आहेत.