उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ

साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. 

Updated: Jul 5, 2017, 07:49 AM IST
 title=

रत्नागिरी : साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. 

वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.चिपळूण तालुक्यातल्या अलोरे येथील झरीना आप्पासाहेब नायकवडे या महिलेला काल संध्याकाळी घरात असतांना साप चावला, त्यानंतर तिला उपचारांसाठी नातेवाईकांनी कामथे येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

मात्र, रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर न पोहोचल्याने तिचा मृत्यू झाला, असं मृत महिलेच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरून नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. 

दरम्यानही घटना कळताच चिपळूणातील शिवसेना कार्यकर्त्यानी कामथे रुग्णालयाला घेराव घालत रुग्णालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या घटनेची पोलिसाना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.