मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा आणि पावसाचे सेलिब्रेशन 'मिरग'

आज सात जून. मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा निसर्गात सजवणारी ही तारीख. काळ पुढे सरकला.  गावांचे उंबरे शहरांकडे सरकले. शहरांची धाव महानगरांकडे गेली. सगळे वेगानं बदलत गेलं. पण पाऊस मात्र तसाच राहीला. आणि याच पावसाचे सेलिब्रेशन म्हणजे सात जून.

Updated: Jun 7, 2017, 03:07 PM IST
मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा आणि  पावसाचे सेलिब्रेशन 'मिरग' title=

मुंबई : आज सात जून. मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा निसर्गात सजवणारी ही तारीख. काळ पुढे सरकला.  गावांचे उंबरे शहरांकडे सरकले. शहरांची धाव महानगरांकडे गेली. सगळे वेगानं बदलत गेलं. पण पाऊस मात्र तसाच राहीला. आणि याच पावसाचे सेलिब्रेशन म्हणजे सात जून.

पाऊस. ऋतुचक्रातील सर्वात देखणा सोहळा. कोसळतो. हसवतो. भिजवतो. लपतो. रुसतो. चिडतो. तरी पुन्हा आठवणीने दरवर्षी दाखल होतो असा हा पाऊस. अवकाळी म्हणून वेळेआधी दाखल झाला तरी वर्षानुवर्षे पाऊसाचा आगमन सोहळा साजरा करणारा दिवस म्हणजे सात जून. कोकणात या सात जूनचे फार महत्त्व असते. मृग नक्षत्राला मालवणी बोलीत मिरग असे म्हणतात. आणि या मिरगाच्या पावसाची सुरुवात कोकणातल्या प्रत्येक घरात अजूनही वैशिष्ठ्यपुर्ण अशीच होते. 

 मृग नक्षत्राचा हा सोहळा सर्वात अगोदर निसर्ग उलगडतो. उष्णतेने तप्त झालेल्या लाल तांबड्या जमिनीवर लाल भुरकट रंगाचा मृगाचा किडा दिसू लागल्यावर मृगाची शुभवार्ता निसर्गाला समजते. मग हळूहळू काजवे दिसू लागतात. वाळवीचे किटक जमिनीवर फिरु लागतात.. निवडूंगाच्या झुडुपाला चौवदारे फुटु लागतात. समुद्राचा रंग बदलू लागतो. आणि सुरु होतो मृगाचा सोहळा. निसर्गच कविता सादर करतो आणि प्रतिभावंताच्या शब्दातून मृगाचा पाऊस उलगडतो.

 शब्दातून आणि निसर्गातून जसा मृग नाचत असतोच. पण मिरग सेलिब्रिट होतो तो शेणाने सारवलेल्या जमिनीच्या, लाल तांबड्या मातीच्या भितींवरली खास कोकणी कौलारु घरात. कोकणातल्या प्रत्येक घरात खास एक मिरगाचा कोंबडा राखून ठेवलेला असतो. पावसाला सुरुवात होते. आणि घराच्या कौलातून निसटलेला खमंगपणा कोकणी मातीत रुजलेल्या मिरग सोहळ्याचे देखणेपण अख्या गावभर मिरवत राहतो.
 
पावसाचे येणे जाणे आता लहरी झालीय. अवकाळीच्या धिंगाण्याला काळवेळ उरला नाही. सेलिब्रेशनला कारण शोधणा-या माणसाना आता कसलही निमित्त लागतं म्हणा.. पण कितीही काही कसंही बदललं ना तरी सात जून आणि मिरग फेस्टीवलची घराघरातील गंमत घट्ट रुतून आहे.. कॅलेंडरच्या सात तारीख लिहिलेल्या जूनच्या पानावर आणि पावसावर प्रेम करणा-या मनावरही.