लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचं दर्शन; हिंदूच्या प्रेताला मुस्लिमांचा खांदा

कोरोनाशी लढा देण्यासाठी सगळे एकत्र 

Updated: Apr 12, 2020, 04:46 PM IST
लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचं दर्शन; हिंदूच्या प्रेताला मुस्लिमांचा खांदा   title=

शशिकांत पाटील, झी मीडिया,लातूर : देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही जण मुस्लिम धर्मियांकडे संशय किंवा तिरस्काराने नजरेने पाहत आहेत. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लातूर जिल्ह्यात एका हिंदू जंगम समाजाच्या इसमाच्या प्रेताला खांदा देण्यापासून अंत्यविधी उरकण्याचे सोपस्कार मुस्लिम तरुण पुढे येऊन करतानाचे चित्र आहे. कोरोनामुळे मानव जात संकटात आली असली तरी माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचेच हे बोलके उदाहरण.

जयश्री महेश स्वामी या पती महेश परमेश्वर स्वामी यांच्यासोबत ०८ वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून उदरनिर्वाहासाठी लातूरमध्ये आल्या. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साई नंदनवन नावाने चहा-नाश्त्याचे हॉटेल चालवून संसार चालवित होते. गेल्या काही दिवसांपासून ४० वर्षीय पती महेश स्वामी हे लिव्हर खराब झाल्यामुळे आजारी होते. त्यातच  लॉकडाऊनमध्ये महेश स्वामी यांची तब्येत ढासळली. त्यामुळे ०४ दिवस लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत उपचार केले. मात्र हाताबाहेर परिस्थितीमुळे घरी घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.घरी येताच सायंकाळच्या सुमारास महेश स्वामी यांची प्राणज्योत मालवली. 

जयश्री स्वामी आणि १३ वर्षीय मुलगा सुशांत स्वामी हे दोघेच घरी होते. लॉकडाऊनमुळे अंत्यविधीला नातेवाईक येणे अशक्य होते. आता काय करावं या विवंचनेत त्यांनी हरंगुळचे माजी सरपंच व्यंकट पनाळेना फोन केला. त्यांनी आवेझ काझी पोलीस अधिकाऱ्याला माहिती दिली. पोलिसांनी सय्यद मुस्तफा या तरुणाला याची माहिती दिली. तोपर्यंत रात्रीचे ११ वाजले. सय्यद मुस्तफा हे मित्र असिफ पठाण, आकाश गायकवाड, राहुल पाटील यांच्या सोबत आले.

 मयताच्या कानातून-नाकातून रक्त येत असल्यामुळे रात्रीतूनच अंत्यविधी उरकावा लागणार होता. मयत महेश स्वामी हे जातीने जंगम. समाजाच्या रितीरिवाजांप्रमाणे प्रेत दफन करणे गरजेचे होते. मात्र 'दफन' करण्यासाठी खड्डे खोदणारा माणूसच लॉकडाऊनमुळे उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्यांना अग्नि देण्याशिवाय पर्याय उरला नाही. आणि त्याची परवानगी जयश्री स्वामी यांनी दिली. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यात काही जण कोरोना हा देशात मुस्लिम समाजामुळे पसरल्याची अफवा सोशल मीडियातून पसरवत आहेत. त्यामुळे मुस्लिम धर्मियांकडे संशयाने किंवा तिरस्काराने पहिले जात असताना सय्यद मुस्तफा हे देवदूतासारखे धावून आल्याची प्रतिक्रिया जयश्री स्वामी यांची होती. तर कोरोना हा जगभरात व्हायरस असला तरी दुर्दैवाने भारतात कोरोनाला काहींनी जात-धर्म दिल्याचे हे युवक सांगतात. 

पतीचे निधन आणि दुसरीकडे अंत्यविधीची चिंता असे दुहेरी संकट जयश्री स्वामी यांच्यापुढे उभे टाकले होते. मात्र नियतीने मुस्लिम तरुणाच्या रूपात देवदूत पाठवून त्यावर मात केली एवढं मात्र नक्की.