मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ( Mansukh Hiren death case ) महाराष्ट्र ATS ला आणखी एक झटका मिळाला आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचा ( Maharashtra ATS ) तपास सुरू होता. मात्र आता हा तपास ATS ने थांबवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला सोपविला होता. मात्र ATS चाही तपास सुरू होता. त्यामुळे NIA कडे तपास आलेला असतानाही एटीएसतपास करत आहे आणि आरोपींची कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे सोपवावीत, अशी विनंती करणारी याचिका एनआयएने ठाणे कोर्टात केली होती.
या याचिकेवरील सुनावणीवेळी ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने ATS ला मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासातली कागदपत्रे NIA कडे देण्यासही सांगण्यात आले आहे.
याशिवाय ATS च्या ताब्यात असलेले आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गौर या दोघांची कस्टडी, सर्व कागदपत्र आज संध्याकाळी ५ पर्यंत NIA कडे सोपवण्यास कोर्टाने सांगितले आहे. दुसरी मोठी माहिती म्हणजे सचिन वाझेंवरील गुन्ह्यात आता UAPA अॅक्टमधील १६ आणि १८ कलमही लावण्यात आले आहे.
कालच ATS ने पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांचा सक्रीय सहभाग होता, असं ATS ने म्हटलेलं. तसेच याप्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, अशी माहितीही ATS ने दिलेली. मात्र आता हा तपास संपूर्णत: NIAचं पाहण्याची शक्यता आहे.