ठाकरे-राणे कार्यक्रमात एकाच व्यासपिठावर?

भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नारायण राणे अशी दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. 

Updated: Jun 23, 2017, 03:28 PM IST
ठाकरे-राणे कार्यक्रमात एकाच व्यासपिठावर? title=

सिंधुदूर्ग : भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नारायण राणे अशी दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. 

शुक्रवारी सकाळी 11 वाजता कुडाळ एसटी स्टॅन्डजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. व्यासपिठावरील आसनव्यवस्थेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात २ खुर्च्यांच अंतर ठेवण्यात येणार आहे.

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भूमीपूजन सोहळा शुक्रवारी होतोय. इंदापूर ते झाराप या 366.17 किलोमीटरच्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणारेय. मुंबई-गोवा महामार्गाच्या कासामाठी 12 हजार 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या महामार्गामुळे कोकण विकासाला ख-या अर्थानं गती प्राप्त होणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

कोकणातल्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनानिमित्तानं श्रेयासाठी शिवसेना भाजपमध्ये चढाओढ सुरू असल्याचं यानिमित्तानं पहायला मिळतंय. कार्यक्रमाआधीच दोन्ही पक्षांमध्ये बॅनर वॉर रंगलंय. आमच्यामुळेच हे काम मार्गी लागल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय. 

शुक्रवारी या महामार्गाचं उदघाटन होणार असलं तरी अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. 2014 मध्ये पहिल्या टप्प्यात 179 कोटी रुपये खर्च करुन महामार्गावरील 14 पूल दीड वर्षांत पूर्ण केले जातील असं जाहीर केलं होतं. मात्र अद्यापही पुलाची कामं अजूनही अपूर्ण आहेत. 

इंदापूर ते धाराप या 366 किलोमीटरच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमीपूजन नितीन गडकरींनी गेल्यावर्षी केलं. मात्र भूसंपादनाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. काही ठिकाणी भूसंपादन झालंय त्याठिकाणी मोबदला मिळालेला नाही. 

366 किलोमीटरच्या पट्ट्याचं एकूण 11 भागात विभाजन करण्यात आलंय. 11 भागाचं 10 टेंडर करण्यात आलं असून तब्बल 6 टेंडरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय. मात्र अद्यापही कामं सुरू करण्यात आलेली नाही. 

नितीन गडकरींनी 1 मे 2018 ला महामार्गाची सगळी कामं पूर्ण होतील असं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही कामच सुरू न झाल्यामुळे हायवे कसा पूर्ण होणार हा देखील एक प्रश्नच आहे. 

असं असलं तरी मुंबई-गोवा महामार्ग अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकत्र येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळातही हा कार्यक्रम अनेकांचं लक्ष वेधणारा ठरणारा आहे.