नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी

नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या महामार्गाची एवढी दुरवस्था झालीय की चार तासांच्या प्रवासाला तब्ब्ल 10 तासांचा वेळ लागतोय.

वनिता कांबळे | Updated: Jul 19, 2024, 09:53 PM IST
नाशिक-मुंबई महामार्गाची भयानक अवस्था; रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी title=

Nashik Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गावर अशी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. चार तासांच्या या प्रवासाला तब्बल 10 तासांचा वेळ लागत आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे, रस्त्यांवरील कामं आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या सगळ्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याचा फटका रुगणांना देखील बसत आहे.   

नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा फटका नाशिकच्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बसतोय. कॅन्सरग्रस्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये विचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या नाशिकच्या रुग्णांना पोहोचणे कठीण होतंय. त्यामुळे कनेक्टेड मध्य रेल्वेने ट्रेन कोच ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी IMA संघटनेने केलीये.. नाशिक स्टेशनवर एक कोच उपलब्ध करून आवश्यकता वाटल्यास कुठल्याही ट्रेन सोबत तो जोडण्यात यावा अशी वैद्यकीय व्यावसायिकांनी मागणी केली आहे.

नाशिक - मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी का होतेय? 

नाशिक ते गोंदे सुरू सिमेंट काँक्रिटीकरणचे काम सुरु आहे.  घोटी येथील फ्लायओव्हरचे अपूर्ण काम, त्यामुळे चौफुलीवर वाहतूक कोंडी होत आहे.  इगतपुरीत सर्व्हिस रोडवर मोठ्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जॅम होत आहे.   आटगाव वासिंदजवळ छोटे ब्रिज आणि रस्त्यावर साईडपट्टीला खड्डे पडले आहेत. शहापूर ते भिवंडी परिसरात असलेल्या उद्योगांसाठी चौफुलीवरील चुकीचे वाहतूक नियोजन केले जात आहे.  फ्लाय ओव्हर नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.  कल्याण शिळफाटा परिसरात प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाची काम सुरू आहे. 

नाशिक ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा चाळीस हजार वाहनांच्या क्षमतेचा आहे. मात्र, सध्या वाहणारी वाहनांची संख्या 60 हजारापेक्षा जास्त आहे. परिणामी या रस्त्याची दुरावस्था झाली. या रस्त्याला चौपदरी ऐवजी सहा पदरी करण्याची गरज आहे. त्यामुळे आता सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवासाचा त्रास कधी संपणार? महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकार कधी लक्ष देणार? असे अनेक सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

नाशिक-मुंबई हायवेची दुरवस्था, 'झी २४ तास'चे सवाल

1. वाहतूक कोंडी होणा-या चौफुली आणि उड्डाणपुलापाशी 24 तास पोलिसांची नियुक्ती का नसते ?

2. 40000 वाहनांची क्षमता असतानाही 60000 पेक्षाही अधिक वाहनांची वाहतूक सुरू, NHAI नियोजन का करत नाही?

3. एका वर्षात तयार होऊ शकणारे उड्डाणपूल आणि रुंदीकरणाची कामं 3-4 वर्ष का प्रलंबित राहतात?

4.  दर पावसाळ्यात महामार्गांची दुरवस्था, राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असतानाही प्रश्न का सुटत नाही?

5. RTO महामार्ग पोलिसांच्या गाड्या एरव्ही हजर असतात, मात्र वाहतूक कोंडीवेळी या गाड्या कुठे जातात?