तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्री वादाच्या भोवऱ्यात

शिवसेनेचे आमदार आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची डिग्री वादात

Updated: Jan 5, 2020, 05:04 PM IST
तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्री वादाच्या भोवऱ्यात  title=

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राहिलेल्या विनोद तावडे यांच्या डिग्रीचा वाद आपल्याला आठवत असेल. तोच वाद आता महाविकास आघाडी सरकारमध्ये तंत्रशिक्षण खात्याचं मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांच्या बाबतीत उद्भवण्याची शक्यता आहे. उदय सामंत यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल आहे.

ज्ञानेश्वर विद्यापीठ हे कुठल्याच प्रकारची सरकारी मान्यता नसलेलं बोगस विद्यापीठ असल्याचा आरोप पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरदास यांनी केला आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्या प्रमाणे उदय सामंत यांची देखील पदवी बोगस असल्याचा त्यांचा आरोप आहे.

विनोद तावडे यांच्या शिक्षणावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळेच्या विरोधकांनी तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता तेच विरोधक सत्तेत आले आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्या शैक्षणिक पात्रता विषयी काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.