ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, उस्मानाबाद : संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक आणि खाजगी कामासाठी होणारा वापर काही नवीन नाही. उस्मानाबादमध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आलाय. संस्थाचालक शाळेतील कर्मचा-यांकडून शेतात कामे करून घेत आहेत. याबाबतचा विशेष वृत्तांत..
शेतात काम करणारे हे लोकं पाहा....कुणाला वाटेल की हे शेतमजूर असतील...तर कुणाला वाटेल सालगडी....मात्र तुमचा हा गैरसमज आहे....कारण हे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पगारी शिक्षक आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या घाटंग्री येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळांमधील हे सर्व कर्मचारी आहेत. भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आहे. कोरोनामुळे ही शाळा बंद असली तरी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कामे सुरूच आहेत. मात्र इथल्या संस्थेतले हे कर्मचारी शाळेऐवजी शेतातल्याच कामांमध्ये व्यस्त आहेत.
या शाळेचे संस्थाचालक गुलाब जाधव या शिक्षकांना सालगड्याप्रमाणे शेतात राबवतात असा आरोप करत त्यांच्याविरोधात जिल्हाधिका-यांकडे तक्कार करण्यात आली आहे.तर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा संस्थाचालक करतायेत. तक्रारदार राजकीय सुडापोटी वारंवार अशा खोट्या तक्रारी करत असल्याचं त्यांचं म्हणणंय.
संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होण्याच्या घटना राज्यात तशा नव्या नाहीत. मात्र संस्थाचालकांच्या असल्या हुकुमशाही वृतीमुळे शिक्षणाचा दर्जा तर खालावतोच पण शिक्षकांच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसतो.